कुतूहल
पाण्यावर चालणारा साचा (भाग २)

जलसाच्यामध्ये सूतकताईच्या चात्याला पंखासारख्या शाखा असतात. या चात्यावर बॉबिन बसविली जाते. चात्याच्या एका शाखेतून सूत नेऊन ते बॉबिनवर गुंडाळले जाते. या पंखाच्या चात्यावर बॉबिन सल बसविलेली असते. त्यामुळे चात्याला आणि बॉबिनला वेगवेगळी गती देता येते. चात्याची आणि बॉबिनची गती जर सारखीच असेल तर बॉबिनवर सूत गुंडाळले जाणार नाही. परंतु बॉबिन व चाते यांच्या गतीत फरक ठेवून सूत बॉबिनवर गुंडाळले जाते. चात्याच्या फिरण्यामुळे सुताला पीळ बसतो आणि त्याच वेळी सूत बॉबिनवर गुंडाळले जाते. याप्रमाणे पीळ देणे आणि सूत बॉबिनवर गुंडाळणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होत असल्याने सूतकताईची प्रक्रिया सातत्याने चालू राहते. यामुळे अशा यंत्रांची उत्पादनक्षमता अधिक असते.
लेविस पॉल आणि जॉन वॅट या शास्त्रज्ञांनी पेळूला खेच देण्यासाठी खेच रुळांची पद्धत व सुताला पीळ देऊन त्याच वेळी ते बॉबिनवर गुंडाळण्यासाठी पंखाचे चाते (फ्लायर िस्पडल) हे सूतकताई उद्योगामधील दोन क्रांतिकारी शोध लावले. या सुधारणांमुळे सूतकताई प्रक्रिया अखंडित होऊन सुताचा दर्जाही सुधारण्यास मदत झाली. लेविस पॉल आणि जॉन वॅट यांनी इ. स. १७४२ मध्ये त्यांनी विकसित केलेल्या खेच रूळ व पंखाचे चाते असलेले सूतकताई यंत्र तयार केले आणि हे यंत्र वापरून त्यांनी इंग्लंडमधील बìमगहॅममध्ये एक सूतगिरणी सुरू केली. या यंत्राला अनेक चाती असल्याने हे यंत्र माणसाने चालविणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हे यंत्र फिरविण्यासाठी गाढवाचा उपयोग करण्यास सुरुवात केली. पण आíथकदृष्टय़ा किफायतशीर ठरले नाही आणि लवकरच ही गिरणी बंद झाली.
रिचर्ड आर्कराइट या शास्त्रज्ञाने वरील दोन तत्त्वे वापरून एक नवा सूतकताईचा साचा (फ्रेम) बनविला. ह्या यंत्राला गती देण्यासाठी आर्कराइटने पाण्याचा उपयोग केला आणि म्हणून या यंत्राला जलसाचा किंवा पाण्यावर चालणारा साचा (वॉटर फ्रेम) असे संबोधले जाते. आर्कराइटने या यंत्राचे १७६९ मध्ये पेटंट घेतले.

चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर
मोगलकाळातील कच्छचे शासक
कच्छचे शासक रावश्री भरमलजी यांच्या कारकीर्दीत मोगलांनी गुजरातची सुलतानशाही उद्ध्वस्त केली. त्या गोंधळाचा फायदा घेऊन भरमलजीने स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यासाठी मोगलांशी १५९० साली झालेल्या लढाईत त्याचा पराभव होऊन कच्छ राज्याला मोगलांचे सार्वभौमत्व पत्करावे लागले. पुढे भरमलजीने बादशाह जहांगिराला १०० कच्छी घोडे, १०० अशरफी आणि २००० रु. रोख असा नजराणा देऊन खूष केले. त्याबद्दल जहांगिरानेही त्याला मानाची तलवार, खंजीर आणि अरबी घोडा देऊन त्याचा सत्कार केला.
त्याकाळी मक्केकडे जाणारे हज यात्रेकरू कच्छ राज्यातल्या सागरी मार्गावरून जात आणि या यात्रेकरूंना त्याचा कर द्यावा लागत असे. बादशाह जहांगीराने या यात्रेकरूंना कच्छ सागरी मार्गावरून मोफत प्रवेश देण्याच्या अटीवर कच्छराज्याकडून खंडणी घेणे रद्द केले. भरमलजीला त्याने स्वतची नाणी पाडण्याचीही परवानगी दिली.
रावश्री दैसुलजी साहीब प्रथम याच्या काळात तत्कालीन मोगल बादशहाने कच्छवर परत एकदा खंडणी लादून त्या वसुलीसाठी तीन वेळा कच्छवर फौज पाठविली. प्रत्येक वेळी दैसुलजीने मोगल फौजांना पराभूत करून भूज येथे भक्कम किल्ला बांधून शहराला तटबंदी केली.
कच्छचे पुढील शासक मिर्झा महाराव लखपतजी याचे बादशाह अलमगीर द्वितीय आणि अहमदशाह दुराणीशी चांगले संबंध होते. अलमगीर द्वितीयने लखपतजीला ‘महाराजाधिराज’ तर दुराणीने ‘महारावश्री’ हे किताब दिले. उच्चशिक्षित असलेल्या महारावश्रीने युरोपचे दौरे करून रेशीम उद्योग, फाऊंड्री, काच कारखाने आपल्या राज्यात सुरू केले.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com