09 July 2020

News Flash

मनोवेध : मेंदूतील लहरी

डेल्टापेक्षा गतिमान लहरी म्हणजे थीटा त्यांची वारंवारता ४ ते ८ हर्ट्झ असते

– डॉ. यश वेलणकर

जागृती आणि निद्रेच्या चार स्थितींमध्ये मेंदूतील विद्युतलहरींत फरक दिसतो. मानवी मेंदूत अब्जावधी मेंदूपेशी (न्यूरॉन्स) असतात. एक मेंदूपेशी तिच्या असंख्य शाखांच्या माध्यमातून दुसऱ्या मेंदूपेशींशी जोडलेली असते. या पेशींमधून विद्युतधारा वाहत असते. मेंदूतील ही विद्युतधारा तपासता येते, तिची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) आणि वारंवारता (फ्रीक्वेन्सी) मोजता येतात, त्यांचा आलेख काढता येतो. त्यास ‘इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी)’ म्हणतात. या आलेखावरून मेंदूतील लहरींचे पाच प्रकार असतात असे लक्षात येते. हे प्रकार त्यांच्या वारंवारतेवरून केले जातात. डेल्टा, थीटा, अल्फा, बीटा आणि गॅमा अशी त्यांना नावे दिली आहेत.

त्यातील सर्वात संथ डेल्टा लहरी; त्यांचे प्रमाण आपण गाढ झोपलेलो असतो तेव्हा जास्त असते. त्यांची वारंवारता ० ते ४ हर्ट्झ (१ हर्ट्झ वारंवारता म्हणजे ती घटना दर सेकंदाला एकदा घडते.) असते. नवजात बालकांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त असते, वय वाढते तसे ते कमी कमी होत जाते. अशा लहरी असलेली झोप माणसाला ताजेतवाने करते. या लहरींचे प्रमाण कमी असेल, तर त्या माणसाला शांत झोप लागत नसते. म्हणजे त्याच्या मेंदूला खरी विश्रांतीच मिळत नाही. मात्र जागेपणी यांचे प्रमाण जास्त असेल, तर ते मतिमंदत्वाचे लक्षण असू शकते. मेंदूला इजा झाली असल्यास याचे जागृतावस्थेतील प्रमाण वाढते.

डेल्टापेक्षा गतिमान लहरी म्हणजे थीटा त्यांची वारंवारता ४ ते ८ हर्ट्झ असते. या लहरी झोपेच्या दुसऱ्या टप्प्याच्या काळात अधिक असतात. जागृतावस्थेत या लहरी अधिक असतात, तेव्हा अंत:प्रेरणा किंवा आभास होण्याची शक्यता जास्त असते. संमोहित अवस्थेतही या लहरी जास्त असतात. या लहरींच्या काळात नवीन कल्पना सुचू शकतात. पण यांचे प्रमाण जास्त असेल तर औदासीन्य, नैराश्य वाढू शकते.

यापेक्षा अधिक गतिमान लहरी या ८ ते १२ हर्ट्झच्या असतात. त्यांना अल्फा लहरी म्हणतात. यापेक्षा वेगवान लहरी बीटा, त्यांची वारंवारता १२ ते ४० हर्ट्झ असते. जागे असताना या लहरी अधिक असतात. डिजिटल ईईजीचा शोध लागेपर्यंत गॅमा लहरी माणसाला माहीत नव्हत्या. जुन्या ईईजी तपासणीत २५ हर्ट्झपेक्षा अधिक वेगवान लहरी नोंदवता येत नसत. आधुनिक यंत्रांमुळे त्यांची नोंद शक्य झाली आहे. या लहरी गायक/नर्तक ‘फ्लो’मध्ये असतात, तेव्हा जास्त प्रमाणात असतात.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 2:56 am

Web Title: waves in the brain zws 70
Next Stories
1 कुतूहल : तिबोटी खंडय़ा कोकणात!
2 मनोवेध : भावनांची मोजपट्टी
3 मनोवेध : मानसिक प्रथमोपचार
Just Now!
X