‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ (रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला म्हणजेच आजाराला स्वत:पासून दूर ठेवा) या म्हणीला प्रमाण मानून आपण सफरचंदाचं सेवन करत असतो. सफरचंद विकत घेताना ती छान लालसर, ताजी, चमकदार अशी बघून घेतो. झाडावरून काढून दुकानात ही सफरचंदं पोहोचायला बरेच दिवस जातात, तरी ही सफरचंदं ताजी, चमकदार कशी दिसतात? या सफरचंदांवर मेण लावलेलं असतं त्यामुळे ती चमकदार दिसतात. सुरीने या सफरचंदांवर घासलं तर तुम्हाला हे मेण दिसतं.
जेव्हा सफरचंद झाडावरून काढली जातात त्या वेळी त्यांच्यावर निसर्गत:च मेणाचं आवरण असतं. सफरचंदामधील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. सफरचंद चांगली स्वच्छ दिसावी म्हणून व्यापारी ती छान घासून पुसतात त्या वेळी हे नसíगक मेण निघून जातं. आता ही सफरचंदं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायची असतात त्यासाठी ती टिकावीत म्हणून त्यांच्यावर मेणाचं आवरण लावलं जातं.
फळांवर किंवा चमक येण्यासाठी खाद्यपदार्थावर लावण्यात येणाऱ्या मेणाच्या प्रकारात नसíगक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार पडतात. नसाíगक मेण म्हणजेच कार्नोबा (पामच्या झाडापासून), मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. हे मेण इथॅनॉलमध्ये विरघळवून वापरलं जातं. पेट्रोलियम मेणामध्ये हायड्रोकार्बन असतात. पेट्रोलियम मेण आरोग्याला हानीकारक असतं.
सफरचंदांवर पाम झाडाच्या पानांपासून तयार झालेलं मेण वापरलं जातं. या मेणामध्ये मेदाम्लाचे ईस्टर, हायड्रोकार्बनच्या लांब शृंखला, अल्कोहोल यांचा समावेश असतो. या पामच्या झाडाव्यतिरिक्त इतर वनस्पतींपासूनसुद्धा मेण मिळवता येतं. सफरचंद थोडय़ा कोमट पाण्यात धुतली तर नसíगक मेण जाऊ शकतं. व्यापाऱ्यानं कोणतं मेण वापरलंय हे आपल्याला कळणं अशक्य आहे पण खूप चमकदार फळं दिसली तर जरा सांभाळून!
अनघा वक्टे, (मुंबई) -office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – अद्वैत मैत्री
अज्ञानानं अंध:कारलेल्या मनात अचानक कोवळ्या उन्हाची सुरेल अन् सुगंधी कवडसा यावा तसं झालं. हा तेजस्वी कवडसा स्वच्छ ज्ञानाचा होता. त्यात किंचितही शंका कुशंकांचे धुलिकण नव्हते. क्षणार्धात मनातलं प्राचीन कोडं सुटलं.
एरवी क्लिष्ट वाटणाऱ्या उपनिषदामध्ये ही चारोळी सापडली. काव्यमय आणि अर्थवाही. त्यातला शब्दालंकार केवळ लोभस.
मुंडक उपनिषदामधील या श्लोकाविषयी बोलतोय..
द्वा सुपर्ण सयुजा सख्य
समानं वृक्षं परिष:स्वजाते;
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्ति
अनश्नन अन्यो अभिचकशीति
भांबावून जाऊ नकोस आणि वाचायंच थांबू नकोस मित्रा.
खास ‘मैत्र’ या संकल्पनेला एका विलक्षण कोटीत नेणारा हा श्लोक आहे.
मुळात, या श्लोकात ‘पक्षी’ ही संकल्पना पूर्णार्थानं विकसित केली आहे.
कल्पना कर मित्रा, फळाफुलांनी डवरलेल्या वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत. एकाच रंगाच्या पंखांचा पिसारा (त्यांनी फुलवला) आहे. एक पक्षी त्या वृक्षावरील मधुर फळाचा आस्वाद घेतो आहे आणि दुसरा पक्षी मात्र केवळ आपल्या तेजात निमग्न आहे. तो दुसरा पक्षी स्थिर, अविचल आहे. तो त्या स्तब्धतेत स्वयंप्रकाशित आहे.
हे झाड कोणते? आणि ते दोन पक्षी कोण?
उपनिषदकारांनी ‘अद्वैत’ सिद्धान्त मांडताना त्यात कोणते ‘दोन’ होते हे विशद करण्यासाठी अनेक दाखले दिले. त्यातील हा देखणा दाखला.
वृक्ष म्हणजे जीवन, विविध ऋतूंमध्ये फुलणारं, फळणारं आणि विकसित होणारं. या वृक्षावर सदैव कुठे ना कुठे तरी कोवळी पालवी फुटतच असते. जीवन म्हणजे आपलं अस्तित्व. या अस्तित्वावर विराजमान झालेले हे दोन पक्षी म्हणजे देहरूपी ‘मी’ आणि चेतस.
देहरूपी मी, त्या वृक्षावरील कडू-गोड फळे चाखतो. म्हणजे इंद्रियांमधून जाणवणाऱ्या विविध संवेदना, त्या कधी रिझवणाऱ्या असतात तर कधी दुखावणाऱ्या असतात. त्या शारीरिक संवेदनांच्या आस्वादात रमलेला एक पक्षी.
तो त्या शारीरिक आस्वादात इतका रमतो की त्या आस्वादाचं आसक्तीमध्ये आणि शोकात कधी रूपांतर होतं हे त्याला कळतही नाही.
तो आपल्या दैहिक जाणिवेत असा काही निमग्न होतो की त्या पलीकडे त्याला काही दिसत नाही. त्या अस्तित्वरूपी जीवनवृक्षाच्या पलीकडच्या फांदीवर बसलेला आणखी एक पक्षी असतो. एकाच रंगपिसाऱ्याचे हे दोन पक्षी. एक शारीरिक जाणिवेत हरवलेला आणि दुसरा फक्त तेजरूप. हा दुसरा पक्षी म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे निष्कलंक चैतन्य. केवळ ऊर्जा. हेच ते द्वैत. एक शारीरिक आणि दुसरे ऊर्जा स्वरूप.
ही ऊर्जा स्वयंप्रकाशी. जीवनातल्या दोन स्पष्ट जाणिवा. परस्परांशेजारी जीवन वृक्षावर विराजमान झालेल्या असतात.
गंमत पुढे आहे, या दोन पक्ष्यांचे, या दोन जाणिवांचे परस्परांशी सख्य आहे. द्वैत आहे पण दुजाभाव नाही. मैत्र असल्यानं द्वैताकडून अद्वैताकडे प्रगती होणार, हे निश्चित.
मित्रा, या द्वैतामधला हा सख्यरूपी नातेसंबंध विलक्षण भावला. ऊर्जा शोधनाच्या वाटेवर अडथळे आहेत, पण वाटचाल करायची आहे आपल्याच मित्राच्या दिशेनं..
(भाग २ उद्याच्या अंकात)
 डॉ.राजेंद्र बर्वे –  drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – श्री. ग. माजगावकर – समांतर पत्रकारितेचे विद्यापीठ
‘माणूसकार श्रीगमा’ या नावाने श्री. ग. माजगावकर (१९२९-१९९७) ओळखले जात. त्यांनी १९६१ ते १९८६ या २५ वर्षांच्या काळात आधी साप्ताहिक आणि नंतर पाक्षिक या स्वरूपात ‘माणूस’ अव्याहतपणे चालवले. या कालावधीत ‘माणूस’ने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध केल्या. सुशिक्षित महाराष्ट्रीयांच्या सदसद्विवेकबुद्धी आणि संवेदनशीलतेला सातत्याने टोचणी लावली. ‘माणूस’ हे ध्यास असलेले लेखक आणि समाजवास्तवाचा हव्यास असलेले वाचक घडविण्याचे विद्यापीठच होते. माजगावकरांची  जडणघडण सावरकरांच्या छायेखाली आणि पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असली तरी विचाराने ते उदारमतवादी होते. इतर विचारसरणीच्या तळमळीच्या लेखकांबद्दल त्यांना आस्था आणि आदर होता. त्यामुळे संघात राहून ते एककल्ली झाले नाहीत, सावरकरवादी असून स्वत:ला खुले ठेवू शकले. त्यांचा कल बुद्धिवादाकडे होता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणारा होता. लोकहितवादी, चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, फुले ही सर्व मंडळी त्यांना आपली वाटत, राष्ट्रीय प्रबोधनाची परंपरा चालवणारी वाटत.
हीच परंपरा त्यांनी ‘माणूस’मध्ये नव्या अवतारात आणण्याचा प्रयत्न केला. तिला आपल्या परीने चालना दिली. विविध विचारप्रवाहांची माणसे त्यांनी ‘माणूस’मध्ये एकत्र आणली.  शरद जोशी यांच्यापासून कुमार शिराळकरांपर्यंत आणि अनिल बर्वे, अरुण साधू यांच्यापासून दि. बा. मोकाशींपर्यंत अनेक तरुण, ज्येष्ठ लेखकांना आपल्याशी आणि ‘माणूस’शी जोडून घेतले. जे जे उत्तम, उदात्त ते ते माजगावकरांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला. गांधीवाद, लोहियावाद, साम्यवाद आणि नक्षलवादही त्यांनी आपलाच मानला. ‘माणूस’ने महाराष्ट्रात समांतर सांस्कृतिक सत्ता निर्माण केली. महाराष्ट्र ढवळून काढला. समांतर पत्रकारितेची परिभाषा आणि नीतिमूल्ये रूढ केली. महाराष्ट्रातल्या समांतर पत्रकारितेने इतके ऐश्वर्य आणि वैभव कधीच उपभोगले नाही.  
१९७४ साली त्यांनी ग्रामायण या संस्थेची स्थापना केली. काही काळ तिचे कामही त्याच तडफेने केले. साक्षेपी संपादक असणाऱ्या माजगावकरांनी मोजकेच पण अर्थवाही आणि विचारगर्भ लेखनही केले. ‘ग्रामदानाची प्रयोगभूमी’ (१९५८), ‘श्रीग्रामायन’ (१९७४), ‘बलसागर’ (१९८४) आणि ‘निर्माणपर्व’ (१९८४) ही चार पुस्तके त्याची साक्ष आहेत.