सॅटिन वीण वापरताना सुती धाग्यांचा वापर केल्यास ते कापड रेशमी कापडासारखे दिसेल, यासाठी अंतिम प्रक्रिया तशा पद्धतीने केली जाते. रंगीत सुताचा वापर करून या विणीच्या कापडात विशेष चमक आणि चांगला भरीवपणा आणता येतो. साध्या विणीच्या कापडापेक्षा हे कापड कमी टिकते. कारण ताण्या – बाण्याची गुंतणूक कमी प्रमाणात असते. तसेच हे कापड सतत हाताळल्यास लवकर मळते. त्यामुळे या कापडाचा वापर, हाताळणी कमी होईल अशाच ठिकाणी जास्त करून करावा लागतो.

सॅटिन विणीमुळे कापडाचा पृष्ठभाग अधिक गुळगुळीत होतो. कापडाची झळाळी (लस्टर) वाढते. तद्वतच कापडाच्या पृष्ठभागावर ताणा – बाण्याची गुंतणूक थेट दिसत नाही. तर तो सपाट पृष्ठभाग आहे असेच वाटते. साध्या विणीसारखे किंवा ट्विल विणीसारखे सॅटिन विणीचे कापड दिसत नाही. कापडाच्या पृष्ठभागावर सूत मोकळे किंवा तरंगते आहे असे भासते. ताण्या – बाण्यासाठी गुंतणूक सुताच्या तरंगामुळे झळाळी जाते. याच तरंगामुळे सॅटिन विणीच्या कापडाचा पृष्ठभाग मऊ/ मुलायम तसेच गुळगुळीत वाटतो. या कापडामध्ये सुताचे तरंग अधिक असल्यामुळे या तरंगावरून प्रकाशकिरणांचे परावर्तन अधिक प्रमाणात होते आणि त्यामुळे या कापडाचा पृष्ठभाग चमकदार दिसतो.
सॅटिन विणीमध्ये प्रमुख दोन प्रकार आहेत. एक ताणादर्शी सॅटिन वीण आणि दुसरी बाणादर्शी सॅटिन वीण. ज्या सॅटिन विणीमध्ये कापडाच्या दर्शनी पृष्ठभागावर ताण्याचे तरंग अधिक प्रमाणात बनविले जातात, त्या विणीला ताणादर्शी सॅटिन वीण म्हणून संबोधतात. या उलट ज्या विणीमध्ये कापडाच्या दर्शनी पृष्ठभागावर बाण्याचे तरंग अधिक प्रमाणात बनविले जातात, त्या विणीला बाणादर्शी सॅटिन वीण म्हणतात. म्हणजेच कापडाच्या पृष्ठभागावर ताण्यापेक्षा बाण्याच्या सुताचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बाण्याचे तरंग अधिक दिसतात. ही बाणादर्शी सॅटिन वीण म्हणून ओळखली जाते.
कापड विणताना साधी वीण, ट्विल वीण आणि सॅटिन वीण या तीन विणी मूलभूत विणी म्हणून ओळखल्या जातात. कापडाच्या अंतिम वापरानुसार विणीची निवड केली जाते. तसेच प्रत्येक विणीमध्येही उपप्रकार आहेत. याखेरीज आवश्यकतेनुसार मूलभूत विणींच्या ऐवजी त्यांचे एकत्रीकरण करूनसुद्धा कधीकधी कापड विणले जाते. याचमुळे कापडाचे अगणित प्रकार आपल्याला मिळतात.

– सतीश भुटडा (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

कोटा साडी आणि कोटा स्टोन

कोटा संस्थानाच्या राज्यकर्त्यांपकी राव किशोरसिंह आणि महाराव भीमसिंह यांनी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्यात विविध व्यावसायिकांना उत्तेजन देऊन आíथक भरभराट केली. किशोरीसिंहाने म्हैसूरहून विशिष्ट साडीचे तज्ज्ञ विणकर कोटय़ांत आणून या साडी विणकामाचा पाया घातला. पुढे अठराव्या शतकात ही वैशिष्टय़पूर्ण रंगांची कोटा-मसुरिया साडी लोकप्रिय होऊन विणकरांचा व्यवसाय फोफावला. रेशीम आणि सुती धागे यांचा अप्रतिम मिलाफ केलेल्या या साडय़ांना पूर्ण देशभरातून मोठी मागणी आहे. कोटा येथील अत्यंत उच्च दर्जाच्या, बारीक पोताच्या चुनखडीच्या दगडाला कोटास्टोन म्हणतात. निळसर, हिरव्या फिक्या आणि तांबूस रंगाच्या कोटा स्टोनलाही देशभरातून बांधकाम व्यावसायिकांची वाढती मागणी आहे. या कोटा स्टोन व्यवसायाचा प्रसारही महाराज भीमसिंह याच्या उत्तेजनामुळे झाला. शत्रुसाल द्वितीय हा कोटय़ाचा अत्यंत बुद्धिवान, धूर्त राजा. व्हाइसरॉयपासून ब्रिटिशांचे अनेक उच्चाधिकारी, राजकीय निर्णयामध्ये शत्रूसालचा सल्ला घेत. पहिल्या विश्वयुद्धात राजा शत्रुसालने ब्रिटिश लष्करात नवीन भरती करून स्वतही एक सेनाधिकारी म्हणून युद्धक्षेत्रात गेला. त्याच्यानंतर गादीवर आलेला भीमसिंह बहादूरची कारकीर्द इ.स.१९४० ते १९४७ अशी झाली. यानेही ब्रिटिश सन्यदलात दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी पार पाडली. प्रजाहितदक्ष असलेल्या भीमसिंह बहादूरने राज्यात शैक्षणिक सुधारणा करून नवीन पाटबंधारे काढून पाणीपुरवठा विभागात आधुनिकीकरण केले. १९४७ साली त्याने कोटा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केलेच, पण विलीनीकरणासाठी चालढकल करणाऱ्या इतर संस्थानिकांनाही भारतात विसर्जित होण्यास उद्युक्त केले. विलीनीकरणानंतरही राजा भीमसिंहने आशियाई क्रीडास्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा यांच्या समितीत सल्लागाराची भूमिका बजावली.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com