News Flash

कुतूहल : पुन्हा हवेचं वजन!

पृथ्वीवर असलेल्या एकूण एक हवेचं वजन आहे ५.२८ ७ १०१८ किलोग्रॅम.

पृथ्वीवर असलेल्या एकूण एक हवेचं वजन आहे ५.२८ ७ १०१८ किलोग्रॅम. अबबब!

आमचा बिट्टय़ा म्हणजे भारीच अवखळ. त्याला एक लिटर हवेचं वजन किती आणि ते कसं केलं, हे सांगितल्यावरही त्याचा पुढचा प्रश्न तयारच. एक लिटर हवेचं वजन समजलं. पण ही जी सगळीकडे हवा भरून राहिली आहे तिचं एकंदर वजन किती? आली की नाही पंचाईत! पण प्रश्न तसा रास्तच. तेव्हा त्याचं उत्तरही शोधायला हवंच.

आता एकूण हवेचं आकारमान मोजणंही कठीणच. आणि ते समजल्याशिवाय आपण योजलेली वायूंच्या गुणधर्माची युक्तीही वापरता येत नाही. तर मग आपण दुसरीच क्ऌप्ती करू या.

हवा हलकी आहे, असं म्हणालात तरी तिचा दाब तर सगळीकडे जाणवतोच ना. साधा पत्र्याचा डबा घेऊन त्यातली हवा काढून टाकली तर लगेच त्याचा चोळामोळा होतो. कारण आत पोकळी, पण बाहेरची हवा त्याला दाबतच सुटते.

तर या हवेच्या दाबाचाच विचार करूया. त्याचं मोजमाप करण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र जर समुद्रसपाटीवर ठेवलं तर त्यातला पारा ७६० मिलिमीटरचा स्तंभ उभारत खडी ताजीम देतो. तुमच्या-आमच्या भाषेत सांगायचं तर समुद्रसपाटीवर हवेचा दाब एका चौरस सेंटिमीटरला एक किलोग्रॅम इतका आहे. आता दाब म्हणजे तितक्या क्षेत्रफळावरचं वजनच. तेव्हा एक चौरस सेंटिमीटर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीच्या तुकडय़ावर जो हवेचा स्तंभ उभा असतो त्याचं वजन एक किलोग्रॅम झालं. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाचं एकूण क्षेत्रफळ काढलं की कळेल आपल्याला एकूण हवेचं वजन.

पृथ्वीचा व्यास आहे जवळजवळ बारा हजार किलोमीटर. तेव्हा पृथ्वीची त्रिज्या झाली त्याच्या निम्मे म्हणजेच जवळजवळ सहा हजार किलोमीटर. त्यावरून भूमितीचा नियम वापरून पृथ्वीचं क्षेत्रफळ काढता येईल की नाही? सोप्पं आहे. जर त्रिज्या १ असेल तर क्षेत्रफळ होतं ४स्र्१२. ते सूत्र वापरलं की पृथ्वीच्या क्षेत्रफळाचं मोजमाप येतं हातात.

ते आलं की परत एकदा त्रराशिक मांडायचं. एक चौरस सेंटिमीटरवरच्या हवेचं वजन जर एक किलोग्रॅम तर त्या एकूण क्षेत्रफळावरचं किती! ते गणित मात्र बिट्टय़ानं पटकन केलं आणि सांगितलं की पृथ्वीवर असलेल्या एकूण एक हवेचं वजन आहे  ५.२८ ७ १०१८ किलोग्रॅम. अबबब!

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : महादेवी वर्मा यांचा काव्य-व्यासंग

निसर्गाचे कुतूहल, त्यात विरून जाण्याची असोशी, परब्रह्माशी एकरूप  होण्याची ओढ, अशा विविध भावतरंगाच्या कविता ‘निहार’मध्ये आहेत. यानंतर १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रश्मी’ – या संग्रहातील काव्यात – वैयक्तिक सुख- दु:खाची, विश्वाच्या सुख-दु:खाशी एकरूप होण्याची, विरून जाण्याची असोशी, चिंतनशीलता, तत्त्वज्ञानाची डूब, हे सारं काही प्रकर्षांने जाणवते. ‘नीरजा’मधील कवितेत आत्म्याची परमात्म्याशी प्रणय मीलनाची ओढ आहे.  हृदयातील अमूर्त भावनांना शब्दरूप देणारी अशी ही कविता आहे. ‘सांध्यगीत’मधील कविता अधिक परिपक्व बनली आहे. सृष्टीशी, जीवनाशी तद्रुपता – हे यातील काव्याचे वैशिष्टय़ आहे. यावरील चारही संग्रहातील निवडक कवितांचा संग्रह आहे – ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘यामा’ हा कायसंग्रह.

‘आधुनिक कवी – महादेवी’ (१९४१) – हा त्यांनी स्वत: निवडलेल्या त्यांच्या कवितांचा संग्रह आहे. ‘हिमालय’ –  हा त्यांचा संपादित काव्यसंग्रह आहे. १९६३ मधील चिनी आक्रमणाच्या वेळी भारतीयांना सजग करण्याच्या उद्देशने अनेक कवींनी स्फूर्तिप्रद कविता लिहिल्या – त्या कवितांचे हे संकलन आहे. ‘सप्तपर्णा’ – (१९६०) – या काव्यसंग्रहात ऋ ग्वेद, अथर्ववेद, सामवेद, कालिदास, भवभूती, वाल्मीकी, अश्वघोष, थेरगाथा, जयदेव, इ. उक्तींचे हिंदी रूपांतर आहे. त्यांच्या सखोल, संस्कृत व्यासंगाचा प्रत्यय देणारा हा संग्रह आहे.  विश्ववेदनेशी नातं सांगणाऱ्या, सामाजिक जाणिवेचं भान ठेवणाऱ्या त्यांच्या ‘यामा’ या कवितासंग्रहाला १९८२ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९३० ते १९३६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘निहार’, ‘रश्मी’, ‘नीरजा’ आणि ‘सांध्यगीत’ – या चारही काव्यसंग्रहातील निवडक, संकलित कवितांचा ‘यामा’ हा संग्रह १९३९ मध्ये प्रकाशित झाला आणि हिन्दी काव्याचा मानदंड बनून राहिला. या संग्रहाला मंगलाप्रसाद पारितोषिकानेही गौरविण्यात आलं आहे.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 12:43 am

Web Title: weight of air
Next Stories
1 कुतूहल : हवेचं वजन किती आहे?
2 महादेवी वर्मा (१९८२) हिंदी
3 मिलियन डॉलर्सची चूक!
Just Now!
X