आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार काल आणि अवकाश यांचे धागे एकत्रित जुळून एक ताणलेलं महावस्त्रच निर्माण झालेलं आहे. त्याच्यावर जिथं जिथं एखादी भारदस्त वस्तू जागा व्यापते तिथं त्या वस्त्राला खळगा पडल्यासारखी वक्रता येते. त्यापायी मग त्याच्याजवळ येऊ पाहणाऱ्या दुसऱ्या वस्तूला ओढ जाणवल्यासारखं घरंगळायला होतं. हेच गुरुत्वाकर्षण.

आइन्स्टाइनच्या म्हणण्यानुसार त्याचा प्रभाव प्रकाशकिरणांवरही पडतो. त्यामुळं एरवी नाकासमोर सरळ रेषेत प्रवास करणारा प्रकाशकिरण या जड वस्तूजवळून जाताना त्याच्याकडे ओढला जाऊन वळण घेतो. त्याची दिशा बदलते. यापायीच मग त्या जड वस्तूजवळ गुरुत्वीय भिंग तयार होतं.

याचाच विचार करून मॅण्डल नावाच्या एका झेकोस्लोव्हाकीय वैज्ञानिकानं एक दिवस आइन्स्टाइनचं दार ठोठावलं आणि त्याला एक सवाल केला. ‘एखाद्या ताऱ्यासमोरून दुसऱ्या ताऱ्याचं भ्रमण झालं तर काय होईल? जरा तेवढं गणित करून सांगाल का?’ आइन्स्टाइनला खरं तर वेळ नव्हता. पण त्याला मॅण्डलची दया आली आणि त्यानं झटपट ते गणित केलं. ते त्याला इतकं आवडलं की त्यावर त्यानं एक शोधनिबंधही प्रकाशित केला. त्यानं सांगितलं की त्यापुढून प्रवास करणाऱ्या ताऱ्यापायी गुरुत्वीय िभग तयार होऊन त्या पाठच्या ताऱ्याची प्रतिमा मोठी होईल.

या गुरुत्वीय िभगाची कल्पना आज खगोलशास्त्रज्ञांसाठी एक उपयुक्त उपकरण झालं आहे. त्याच्या मदतीनं विश्वाच्या तसंच आपल्याला न दिसणाऱ्या अदृश्य विश्वाच्या, डार्क मॅटरच्या व्याप्तीचं मोजमाप करणं शक्य झालं आहे.

अतिशय दूर असलेल्या ताऱ्यांपासून येणारा प्रकाश मंदच असतो. तो तारा त्यामुळं नीटसा दिसत नाही. पण आता त्याची प्रतिमा मोठी झाल्यामुळं तो स्पष्ट दिसू शकतो. शिवाय ती प्रतिमा किती मोठी होते याचं मोजमाप करून त्या पुढून जाणाऱ्या ताऱ्याचं वस्तुमान मोजता येतं.

आता हबलच्या दुर्बणिीची साथ मिळाल्यामुळं तर ते मोजमाप अधिकच अचूक बनलं आहे. नुकताच अशाच एका दूरवरच्या ताऱ्यानं एका श्वेत बटू ताऱ्याच्या पाठीमागून प्रवास केला. त्या वेळी त्या दूरच्या ताऱ्याच्या प्रतिमेचं मोजमाप करून त्या श्वेत बटूचं वस्तुमान मोजलं गेलं. ते आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या दोनतृतीयांशाएवढं भरलं. गणित करून ते तेवढं असल्याचं भाकीत केलं गेलं होतंच. पण प्रत्यक्ष मोजमाप करून ते सिद्ध करणं नेहमीच चांगलं असतं. नाही का!

चित्रसंदर्भ : quantum-field-theory

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

एम. टी. वासुदेवन नायर – साहित्य

श्री. नायर यांनी कथा, पटकथा, कादंबरीलेखन केलेलं असलं, तरी कथालेखन हे त्यांचे आवडते माध्यम आहे. केरळ कुटुंबातील बदलते जीवन व एकत्र कुटुंबपद्धतीचा शेवट यांनी उद्भवलेल्या समस्यांचे, त्यांच्या मानसिक तणावाचे, असमाधानाचे चित्रण ते करतात. त्यांचे कुटल्लूर हे गाव, तेथील नदी, टेकडी यांची पाश्र्वभूमी त्यांच्या कथालेखनात दिसते. त्यांच्या कथेतील व्यक्तिरेखाही याच गावातील दिसतात. त्यांच्या जाती-पोटजाती, रीतिरिवाज, त्यांच्या व्यथा, वेदना, एकाकीपण, असह्य़ वर्तमान आणि धूसर भविष्यकाळ यांच्या काचात रगडल्या जाणाऱ्या समाजाचे दु:ख, कठोर, जाचक समाजव्यवस्थेमुळे निर्माण होणारे प्रश्न यावर त्यांनी आपल्या कथांतून प्रकाशझोत टाकला आहे. या गावातील माणसांची दु:खे, कज्जे, दावे, खटले यांनी त्यांच्या कथालेखनाला विषय पुरवले आहेत. कथेसाठी विषय निवडताना त्यांच्या मुळाशी त्यांच्या सुरुवातीच्या जीवनातील ही परिस्थिती होती.

कुणी का लिहितं? यासाठीच की कधीकधी काही तरी सांगण्याची इच्छा होते, कारण काही प्रश्न आपणाला विचलित करतात. साहित्याच्या निर्मितीसंबंधीचे हे विचार त्यांनी ‘कथिक ण्टे कला’ (कथाकाराची कला) या १९८४ मध्ये लिहिलेल्या समीक्षाग्रंथात मांडले आहेत. श्री. नायर यांचं कथासाहित्य हे स्वत:च स्वत:शी, समाजाशी आणि विरोधाने भरलेल्या जगात मनुष्याने नियतीशी घातलेली हुज्जतच आहे. त्यांच्या कथेतील पात्रे कनिष्ठ मध्यमवर्गातील आहेत. अशा लोकांना समाजातील नव्याने उदयास आलेल्या शक्ती नेहमी बाजूला टाकत असतात. शहरातील राक्षसी मूल्यांच्या ज्वालांपासून त्यांचं ग्रामीण जीवनही वाचलेलं नसतं आणि मग अपरिहार्यपणे एकाकीपण त्यांच्या वाटय़ाला येतं आणि हे सगळं आपल्या लेखनातून त्यांनी समर्थ अशा शैलीमध्ये व्यक्त केले आहे आणि त्यामुळेच अनेक भारतीय भाषांत, इंग्रजीमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले आहेत. या एकाकी जीवनातील दु:ख, कारुण्य आपल्या ‘अकत्तलडगल’ (घरआंगण), ‘कुट्टय़ेहति’ आणि ‘इरुट्टिष्टेआत्मानु’ (अंधाराचा आत्मा) यासारख्या कथांतून ते मांडतात.

१९५२ मध्ये विद्यार्थिदशेत असतानाच ‘रक्तम् पुरण्टा मतरिकळ’- हा त्यांचा पहिला कथासंग्रह आणि १९९२ मध्ये ‘वानप्रस्थम्’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. आत्तापर्यंत त्यांचे अठरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com