सन १६४० ते १६६० या काळात इंग्लंडहून अमेरिकेत अनेक ब्रिटिशांनी स्थलांतर केले. विशेष म्हणजे, या स्थलांतरितांपैकी ७० टक्के लोकांनी स्थलांतर केले ते वेस्ट इंडिज बेटांवर. यांतील बहुतेक लोक पाच वर्षांच्या मजुरीच्या करारावर गेले होते. पाच वर्षांनंतर या मजुरांना प्रत्येकी पाच एकर जमीन देण्यात आली. पुढे या इंग्रज मजुरांपैकी अनेक जण बार्बाडोसमध्ये स्थायिक झालेच; पण त्याशिवाय ब्रिटिश सरकारने पकडलेले आयरिश युद्धकैदी आणि गुलाम, ब्रिटिश गुलाम अशा स्थलांतरितांचा बार्बाडोसमध्ये अधिक भरणा होता.

सन १६२५ मध्ये कॅप्टन जॉन पॉवेल हा पहिला ब्रिटिश संशोधक त्याच्या ‘ऑलिव्ह ब्लॉसम’ या जहाजाने बार्बाडोसच्या भूमीवर आला, त्या वेळी त्याने त्या भूमीला वंदन करून तत्कालीन ब्रिटिश सम्राट किंग जेम्स (पहिला) याच्या वतीने येथील सर्व भूमीचा ताबा घेतला होता. तेव्हापासूनच बार्बाडोस ब्रिटनच्या मालकीचे झाले! १६२७ मध्ये बार्बाडोस ही एक ब्रिटिश वसाहत म्हणून नावारूपाला आली. सुरुवातीस ब्रिटिशांनी तिथे तंबाखू, आले, कापूस आणि नीळ यांची लागवड केली. या शेतीवर काम करण्यासाठी इंग्रज आणि इतर युरोपीय कंत्राटी पद्धतीने करारावर आणले.

पुढे १६४० साली ब्रिटिशांनी बार्बाडोसमध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली; कारण युरोपात तंबाखूचे भाव गडगडले आणि तो व्यापार आतबट्ट्याचा ठरू लागला. तसेच शेतावर मजुरी करण्यासाठी ब्रिटिशांनी युरोपीय लोक बार्बाडोसमध्ये आणले होते; परंतु तिथे उद्भवणाऱ्या विविध आजारांनी हे लोक हैराण झाले, अनेक जण मृत्यू पावले. त्यामुळे ब्रिटिशांनी ऊसमळ्यांवर मजुरी करण्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणणे सुरू केले. १६६० साली ब्रिटिश सम्राटाने बार्बाडोस वसाहतीसाठी गव्हर्नर व गव्हर्निंग कौन्सिल नेमले. या कौन्सिलसाठी वर्षातून एकदा निवडणुकाही घेण्यात येऊ लागल्या.

ब्रिटिशांनी बार्बाडोसमध्ये ऊस लागवड सुरू केली ती ब्राझीलमधील डचांच्या तंत्रज्ञानविषयक आणि काही वेळा आर्थिकही साहाय्याने. या ऊसमळ्यांच्या लागवडीने आणि साखर उत्पादनाने बार्बाडोसमध्ये सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती घडवून आणली. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com