24 October 2020

News Flash

हर्षवायू

हल्ली खळखळून हसणं जरा कमीच झालंय.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हल्ली खळखळून हसणं जरा कमीच झालंय. व्यायाम म्हणून हास्य क्लबचे सदस्य होऊन सकाळी मुद्दाम हसण्याचा कार्यक्रम बऱ्याच बगिच्यांमध्ये पाहायला मिळतो. मिकी-माऊससारखा कार्यक्रम अथवा एखादा कॉमेडी चित्रपट पाहून आपण भरपूर हसतो. असाच एक हसवणारा वायू म्हणजे नायट्रोजन.

एखादा समारंभ चालू आहे आणि अचानक सगळे हसायला लागले, हसायचं नसतानाही सगळे हसतायेत, असा किस्सा आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. वातानुकूलित यंत्रात वायू भरायला सिलेंडर घेऊन आलेले, चुकून दुसऱ्या सिलेंडरमधील वायू भरताना दाखवला जातो. हा वायू असतो नायट्रस ऑक्साइड.

या नायट्रोजनच्या ऑक्साइडचा शोध सर्वप्रथम १७७२मध्ये जोसेफ प्रिस्टले या रसायनशास्त्रज्ञाने लावला. थॉमस बेडोस आणि जेम्स वॅट यांना १७९४ मध्ये नायट्रस ऑक्साइडच्या वैद्यकीय उपयोगाचा शोध लागला. ‘हम्प्फ्रि डेव्ही’ यांनी या वायूच्या वेदनाशामक या गुणधर्माचा अभ्यास करताना, या वायूला संमोहनाचा गुणधर्म आहे. हे सिद्ध केले. काही वेळा नायट्रस ऑक्साइडच्या हुंगण्याने मनुष्य बराच वेळ हसत राहतो म्हणून ‘हम्प्फ्रि डेव्ही’ यांनी या वायूला ‘हर्षवायू’ हे नाव दिले. दंतचिकित्सा, शस्त्रक्रिया, बधिरीकरण (अ‍ॅनस्थेशिया), वेदनाशामक अशा अनेक कारणांसाठी नायट्रस ऑक्साइड वापरला जातो.

नायट्रोजन जीवन देणारा नसला तरी जीवनासाठी आवश्यक मात्र आहे. नायट्रोजन डी.एन.ए.चा तसेच सर्व प्रथिनांचा एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच बऱ्याच कार्बनी पदार्थातही नायट्रोजन आढळतो. सूक्ष्मजंतू, तडित् (कडाडणारी वीज) व रसायने यांमुळे होणाऱ्या नायट्रोजनच्या स्थिरीकरणामुळे (मुक्त नायट्रोजनपासून नायट्रोजनयुक्त संयुगे तयार करण्यामुळे) हवेतील नायट्रोजनचे प्रमाण कमी होते. कार्बनी पदार्थाचे ज्वलन आणि त्यांचे सूक्ष्मजीवांकडून होणारे अपघटन यांमुळे नायट्रोजनमुक्त होतो आणि हवेतील नायट्रोजनचे प्रमाण कायम राखले जाते.

हवाबंद डब्यातील/ पिशव्यांमधील अन्नपदार्थ ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन खवट होऊ नयेत, जिवाणूंमुळे खराब होऊ नये तसेच बुरशी लागू नये म्हणून त्यातील हवा काढून त्यात नायट्रोजन भरले जाते. ज्वलनशील नसलेला नायट्रोजन औद्योगिक क्षेत्रात फार उपयोगी पडतो. खते, नायट्रिक आम्ल, नायलॉन, रंग आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी हे मूलद्रव्ये वापरले जाते. या उत्पादनांसाठी महत्त्वाचा घटक म्हणून सर्वप्रथम नायट्रोजन आणि हायड्रोजनच्या अभिक्रियेने कित्येक टन अमोनियाची निर्मिती केली जाते.

-अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 2:30 am

Web Title: what is nitrogen 3
Next Stories
1 विल्यम कॅरे
2 फादर स्टीफन्सची भाषा : अभ्यास आणि शैली!
3 विज्ञान नगरीचा जादूगार
Just Now!
X