नवीन कार घेताना त्या कारमधील नवनवीन तंत्रज्ञानाची आवर्जून ओळख करून दिली जाते. त्यात महत्त्वाचे म्हणजे अपघात झाला तर वाहनचालक आणि त्याच्या बाजूच्या सीटसमोर येणाऱ्या हवेच्या पिशव्या. वाहनाचा वेग अपघाताने अचानक कमी झाला आणि वाहन थांबले तर वाहनाच्या वेगात असलेले वाहनचालक आणि वाहनातील प्रवासी, त्याच वेगाने पुढे आदळतात. सीट बेल्ट लावलेला असेल आणि हवेच्या पिशव्यांची सोय असेल तर अशा अपघातात वाचण्याचे प्रमाण वाढते.

वाहनांमधील या हवेच्या पिशव्यांमध्ये सोडियम अझाइड (NaN3) आणि इतर रसायने (अभिक्रियेत तयार होणाऱ्या  सोडियमचा अपाय होऊ नये म्हणून) असतात. कारच्या पुढच्या बाजूस क्रॅश सेन्सर ही अपघात ओळखणारी यंत्रणा असते. ही यंत्रणा वेगदर्शकाला (स्पीडोमीटरला) जोडलेली असते, अपघात झाला की होणाऱ्र्या धडकेमुळे वेगात अचानक बदल होतो, जो वेगदर्शकामध्ये शून्याकडे जाणारा असतो. तो ओळखला जाऊन सेन्सर, विद्युत संकेत पाठवतो आणि हवेच्या पिशव्यांत लहानसा स्फोट घडवतो. यात निर्माण होणाऱ्यास उष्णतेने सोडियम अझाइडचे विघटन होऊन सोडियम धातू आणि नायट्रोजन वायू तयार होतो. हा नायट्रोजन वायू पिशव्यांमध्ये भरला जाऊन वाहनचालक आणि त्याच्या बाजूच्या व्यक्तीला अपघातातून वाचवतात.

कोणत्याही वाहनाचा पाया म्हणजे त्याचे चाक  वाहनामध्ये इंधनाबरोबरच आवश्यकता असते ती चाकामधील हवेचा दाब योग्य ठेवण्याची. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे चाकांमध्ये हवेऐवजी नायट्रोजन भरून घेण्याचा कल वाढला होता. अजूनही काहीजण वाहनाच्या चाकांमध्ये नायट्रोजन भरून घेतात. खरंतर चाकामध्ये हवा नि:शुल्क भरली जाते, पण नायट्रोजन भरताना मात्र शुल्क द्यावे लागते. चाकामधील हवा तपासण्याचे काम जसे वारंवार करावे लागते तसे नायट्रोजनच्या बाबतीत होत नाही. हवेत असलेल्या बाष्पाची तापमान वाढले की वाफ होते आणि वाहनाच्या चाकातील दाब बदलतो. नायट्रोजन भरल्यामुळे चाकाच्या दाबात फार बदल होत नाही. नायट्रोजनच्या थंडाव्यामुळे चाक गरम होत नाही. रस्त्यावर चाकाच्या घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णताही नायट्रोजन शोषून घेतो. हवेतील बाष्प आणि ऑक्सिजनचा परिणामही चाकावर होतो. याचसाठी शर्यतीसाठी असणाऱ्या कार आणि विमानाच्या चाकांमध्ये नायट्रोजन वायू वापरला जातो.

-अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org