हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
खरंतर दातांचा रंग नसíगकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी असतो. दंतवल्क (एनॅमल) पारदर्शक असते, दंतवल्काच्या आत दंतिन असते, या दंतिनचा रंग आपल्याला दिसत असतो. हा रंग बदलण्यास शरीरातील अंतर्गत तसेच बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. दंतवल्कास तडे पडले तर अन्नपदार्थातील रंग दातांमध्ये शोषले जाऊन दातांना त्यांचा रंग येतो. चहा, कॉफी, मद्य, फळांचे रस, तंबाखूचे सेवन यांमुळेसुद्धा दातांचा रंग बदलतो. वयोमानानुसार दातांच्या रंगात फरक पडतो. जसे वय वाढते तसे दंतिनचा रंग गडद पिवळा होतो. दुधाच्या दातांवरील आवरण (दंतवल्क) पारदर्शक नसते त्यामुळे दुधाचे दात पांढरे शुभ्र दिसतात. जर दात किडले तर दातांवर काळे डाग पडतात. काही आजारांमुळे तसेच टेट्रासायक्लिनसारख्या प्रतिजैविकांच्या सेवनांमुळे दातांचा रंग बदलतो.
    नैसर्गिकरीत्या दात शुभ्र नसले तरी प्रत्येकाला पांढरे शुभ्र दात हवे असतात. दात शुभ्र करणाऱ्या अनेक टूथपेस्ट उपलब्ध आहेत. या टूथपेस्टमधे दातांवरील डाग नाहीसे करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर विरंजक द्रव्य (ब्लीचिंग एजंट) म्हणून केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड सूक्ष्मजीवविरोधकही आहे. हायड्रोजन पेरॉक्साइडबरोबर कार्बामाइड पेरॉक्साइडचा वापर काही टूथपेस्टमधे केला जातो. याशिवाय सोडिअम बायकाबरेनेट, पॉलीव्हिनाइल पायरोलीडन, सोडियम ट्रायपॉलीफॉस्फेट, पॅपिन हे नैसर्गिक एन्झाइम ही रसायने टूथपेस्टमध्ये वापरली जातात.
खरंतर सीलिका, कॅल्शियम काबरेनेट ही अपघर्षके दंतवल्कावरील डाग दूर करतात आणि त्यानंतर दात शुभ्र करणारी रसायने आपले कार्य करतात. दातांवर डाग पडू नये म्हणून दातांची स्वच्छता नियमित ठेवणे आवश्यक आहे.
अनघा वक्टे , मुंबई , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई ss  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – क्वांटम माइण्ड
मन म्हणजे काय? मन म्हणजे मॅटर नव्हे आणि मॅटर म्हणजे काय? नेव्हर माइण्ड.. (mind is not matter, what is matter then? never mind!) हा नर्मविनोद मानसशास्त्राच्या विषयावरील अभिजन श्रोत्यांसमोर हमखास यशस्वी ठरतो. मन म्हणजे काय ठाऊक नाही. पण मन म्हणजे वस्तू नव्हे, हे नक्की. ठिकाय, मग पदार्थ म्हणजे नेमकं काय? कोण जाणे? कशाला त्याची खटपट..!
या विनोदाला असा गमतीदार अर्थ आहे, पण त्याला इतिहासही आहे. कारण मन म्हणजे काय, हा प्रश्न तत्त्ववेत्त्यांना पडला. त्याचा अर्थ तत्त्वचर्चेमधून त्यांनी शोधला आणि मानसशास्त्र (शास्त्र असूनही) विज्ञानाच्या परिभाषेतून आणि क्षेत्रामधून निसटलं आणि बराच काळ मानसशास्त्राची थोरथोर शास्त्रज्ञांनीही अवहेलना केली. या शास्त्राला पॉपीकॉक म्हटलं! आणि या विषयाला पुरेसं महत्त्व दिलं नाही.
इकडे पदार्थ विज्ञानानं मात्र वस्तू-पदार्थाचे विभाजन करून त्याचा सूक्ष्म अभ्यास करण्याचे ज्ञानयज्ञ आणि सत्र आरंभिले. हातात धरता येत नाही, मोजता येत नाही. डोळ्यांनी दिसत नाही. कानानं ऐकू येत नाही अशा ‘मन’ नावाच्या संकल्पनेचं करायचं काय, हा प्रश्न प्रदीर्घ काळ अनुत्तरित राहिला. त्यात सिग्मंड फ्रॉइड यांनी मनाचा अभ्यास करण्यासाठी मनोविश्लेषण करण्याचा मार्ग स्वीकारला. मनोव्यापारामध्ये मनानं कल्पिलेले अद्भुत जग (फॅण्टसी) कामभावना, स्वप्नमीमांसा, मनोगंड अशा गूढ आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींचा समावेश केल्यानंतर ‘विज्ञान जगतानं’ मानसशास्त्राला वाळीत टाकल्यासारखं केलं. किंबहुना मानसशास्त्र हा चेष्टेचा विषय झाला. मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारक, मनोविकारतज्ज्ञ यांच्यावरील थट्टा-विनोद बोकाळले.
नंतर मानसिक आंदोलन, भावनांचे चढउतार, विचारविलसितांचा वादंग या गोष्टींचा अभ्यास करण्याचे नवे मार्ग उपलब्ध झाले आणि प्रत्येक गोष्ट आता आम्ही पुराव्यानं सिद्ध करू शकतो, उगीच आमच्यावर भाकडकथांचे आरोप करू नका, असं आता मानसशास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. ये किस्मत का खेल नहीं, ये कॉम्प्युटर सायन्स का कमाल है!
गेली पंचवीस-तीस र्वष संगणकशास्त्रावर आधारित स्कॅन तंत्रांनी मानसशास्त्राला,  मनोविकारशास्त्राला विलक्षण बळ दिलंय. त्यामुळे मनातली वैचारिक आणि भावनिक वादळं चक्क मेंदूमधल्या ठरावीक ठिकाणी कशी घडतात याचे पुरावे मिळतात. (फ्रॉइडनं हेच भविष्य वर्तविलं होतं. पण लक्षात कोण घेतो?)
आता यापुढची पायरी म्हणजे याच ‘मन’ नावाच्या गोष्टीचा अधिक सूक्ष्म अभ्यास सुरू झालाय. प्रत्येक पेशीला मन नसलं तरी स्मरणशक्ती असते. पेशीतल्या ‘आरएनए’मध्ये ती साठवली जाते आणि मनाचे चढउतार म्हणजे काही अणूरेणूंच्या हालचाली अशा दिशेनं संशोधन सुरू झालंय आणि त्याचं नाव आहे क्वांटम माइण्ड! म्हणजे क्वांटम फिजिक्स तसं क्वांटम माइण्ड!!
माइण्ड डझ मॅटर!!
डॉ.राजेंद्र बर्वे –  drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व –  कोत्या समजुती व भ्रमापासून इतिहास मुक्त करतो
‘‘स्थितिविशेष नेहमी दृष्टीसमोर असल्याच्या योगाने बुद्धीवर जो संकुचितत्त्वाचा वाईट संस्कार घडलेला असतो तो मोडण्यास दोनच मार्ग आहेत; एक देशोदेशी हिंडून परराष्ट्राविषयी प्रत्यक्ष माहिती करून घेणे; आणि याच्या खालोखालचा दुसरा मार्ग म्हटला म्हणजे अर्थातच तसे ज्यांनी केले आहे त्यांपासून भाषणद्वारा किंवा लेखनद्वारा ते ज्ञान मिळविणे. आता पहिला मार्ग व दुसर्यातील पहिली सोय ही फारच थोडय़ांस अनुकूल असतात; यास्तव एकंदर लोकांच्या उपयोगाचा मार्ग म्हटला म्हणजे इतिहास, देशांतर वर्णनें, प्रवासाच्या हकीकती वगरेच होत.’’
 ..असे इतिहासाविषयी विष्णूशास्त्री चिपळूणकर सांगतात आणि पुढे त्याच्या फायद्यांविषयी लिहितात –
 ‘‘शहाणे काय ते आम्ही; रीतभात उत्तम म्हणजे काय ती आमचीच; सर्व सुधारणेचे आगर म्हणजे आमचाच देश; खरा व सदाचरणप्रवर्तक असा आमचाच धर्म..आमची भाषा उत्तम, आमची विद्या, आमच्या कला याच बाकीच्या सार्या जगास वंद्य..अशा प्रकारच्या ज्या निराधार कोत्या समजुती त्या नाहीशा होऊन इतिहासाच्या योगाने आपणांविषयी व इतर राष्ट्रांविषयी यथार्थ ज्ञान वाचकांस होते. आपली मोठी मानवजाती जी सार्या भूमंडळावर पसरली आहे, व एकेक राष्ट्र केवढेही ज्ञानसंपन्न किंवा थोर असले तरी ते जिचा केवळ एक कोपरा असते, तिचे सर्वाशी जेव्हा पर्यालोचन करावे, तेव्हाच तिचे एकंदर खरे स्वरूप लक्षात येते. मनुष्यस्वभावाच्या नित्य व शाश्वत स्वरूपापासून त्याचे आगंतुक म्हणजे देशकालविशेषजन्य स्वरूप निवडता येण्यास अर्थात असेच एकंदर सर्व राष्ट्रांचे मनाने आकलन झाले पाहिजे. असो; तेव्हा मनाचा दृक्प्रदेश वाढवून कोत्या समजुतींपासून व भ्रमापासून इतिहास त्यांस मुक्त करितो, व आपणांविषयी व इतरांविषयी यथार्थबुद्धी मनात आणून देऊन इतरांशी सलोखीने वागण्यास तो आपणांस शिकवितो..’’