मिनरल टप्रेन्टाइन हे ‘व्हाइट स्पिरिट’ (स्वच्छ, पारदर्शक द्रावण) वर्गातले द्रावण असून ते १४५ ते २०५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळते. रंग, वाíनश, लेकर्स यांचे पृष्ठीय थर (सरफेस कोटिंग) देण्यासाठी हे द्रावण मोठय़ा प्रमाणात वापरतात. या द्रावणात असलेल्या एरोमेटिक हायड्रोकार्बन्सच्या अंशामुळे त्याची द्रावणीयता वाढीव स्वरूपाची असते. त्याची ही द्रावणीयता व हळुवार उडून जाण्याची क्षमता यांच्या समतोलपणामुळे समप्रमाणात कोटिंग करताना खूप फायदा होतो. तसेच शाई तयार करण्यासाठी, कीटकनाशके निर्मितीसाठी, जलरोधक पदार्थ तयार करण्यासाठी या द्रावणाचा वापर होतो. ड्रायक्लिनिंग करताना, वूलनचे कपडे या द्रावणात भिजवून घुसळविले असता कपडय़ातील तंतूत अडकलेले तेलाचे कण या द्रावणात विरघळतात व कपडे सुकविले की ते स्वच्छ दिसतात.
केरोसिनच्या वर्गात मोडणारी द्रावणे १६० ते ३०० अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळतात. एरोमेक्ससारखी द्रावणे या वर्गात मोडतात. मात्र, बेंझिन व टॉल्विन ही शुद्ध एरोमेटिक स्वरूपाची द्रावणे होत. त्यांचे उत्कलन िबदू विशिष्ट तापमानाचे असतात. बेंझिन ८० अंश सेल्सिअसला उकळते तर टॉल्विन ११० अंश सेल्सिअसला उध्र्वपातित होते. बेंझिनचा वापर नायलॉन, प्लास्टिक, कृत्रिम रबर, फिनोलिक रजीन-संयुगे, पॉलिस्टर, डिटर्जन्टस, औषधे, कीटकनाशके तयार करण्यासाठी होतो. टॉल्विनचा वापरदेखील रसायने, औषधे, स्फोटके, रंग, रेजिंस तसेच खाद्यपदार्थाना स्वाद देणारे घटक तयार करण्यासाठी होतो. ही दोन्ही शुद्ध रसायने नॅफ्थापासून मिळविली जातात व त्यांच्या उत्कलन बिंदूनुसार वेगळी केली जातात. दोन्ही रसायने रंगहीन व ज्वालाग्राही असतात. त्यांना विशिष्ट  ‘एरोमॅटिक’ हायड्रोकार्बन्समुळे वास येतो. पेट्रोलियम द्रावणांचा वापर पाहता, त्यांच्यात विशिष्ट गुणधर्म असणे आवश्यक असते. हे गुणधर्म विशिष्ट  चाचण्यांद्वारे कटाक्षाने पडताळून पाहिले जातात. या द्रावणांची बाष्पशीलता (व्हॉलेटिलिटी), घनता, वास, द्रावणीयता (सॉल्व्हंट पॉवर), ज्वलनिबदू हे काही गुणधर्म त्या त्या द्रावणाची कसोटी ठरवितात.ल्ल जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – आत्मचिंतनाच्या वाटा..
‘अविद्या दोषेण विद्यमानस्य
आत्मन: तिरस्कारणात्
आत्महन: इत्युच्यते’
ईशउपनिषदातील एका श्लोकावर भाष्य करताना श्रीशंकराचार्यानी वरील श्लोक रचला.
स्वत:च्या स्वरूपाचं सम्यक्ज्ञान नसणारा किंवा ‘स्व’ रूपाबद्दल अज्ञानी असणाऱ्या व्यक्तीविषयी ते अतिशय नेमक्या शब्दात इथे निरूपण करतात. श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा.. स्वत:च्या सद्य रूपाबद्दल अज्ञान बाळगल्यानं स्वत:चा धिक्कार करणारा, तिरस्कार करणारी व्यक्ती जणू काही आत्महन – आत्महत्या करते.
स्वत:ला न ओळखता, स्वत:चं आत्मचैतन्यरूपी स्वरूप न जाणता किंवा त्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करून, स्वत:बद्दल नकारात्मक भावना बाळगणारी व्यक्ती स्वत:ची हानी करते. जणू आत्महत्या करते. अर्थात इथे ‘स्व’ म्हणजे केवळ स्वत:चे दैहिक नामरूप नव्हे. स्वत:ची ऐहिक ओळख नव्हे तर आपण कोण आहोत? तर विश्वचैतन्याचं आपण प्रकट रूप आहोत, हे न जाणता त्या चैतन्याचा तिरस्कार करतो, तेव्हा आपणही जणू काही आपल्यामधील त्या चैतन्याची हानी करतो.
आपलं म्हणजे माणसाचं अथवा जीवित वस्तुमात्राचं नेमकं  स्वरूप कोणतं? यावर अभ्यास अथवा चिंतन करण्याच्या भानगडीत फारसं कोणी पडत नाही. आयुष्यात येणाऱ्या कमी-अधिक दु:खकारक अथवा क्लेशकारक अनुभवांमुळे आपण मन डागाळून घेतो. आसक्ती, तृष्णा नि हाव अशा न तृप्त होणाऱ्या वासनांचे मोह म्हणजे आपल्यावरचे डाग अथवा प्रदूषण.
ही प्रदूषणं आपण ओढवून घेतली. आपल्या लोभी, हावरटपणामुळे मनाला क्लेश होतात. आसक्तीमुळे आपल्या मूळ शुद्ध रूपाची विटंबना होते. आपलं मूळ चैतन्यरूप निर्दोष आणि निष्पाप असतं. आपण मूल म्हणून जन्माला येतो ते अशा निष्कलंक स्वरूपात. तेच आपलं खरं ‘चैतन्य रूप’. या निर्मल चैतन्याची ओळख पटवून घेणं आणि तेच आपलं मूळ रूप आहे, हे जाणणं म्हणजे आत्मविश्वास. ते न जाणता, त्यावर दोषारोप करणं म्हणजे आत्महत्या. आत्महत्या म्हणजे विश्वचैतन्यावरील अविश्वास. अशा अविश्वासामुळे मन विषण्ण आणि उदास होतं, निराश होतं.
आत्मचिंतन म्हणजे केवळ मनातल्या मनात केलेला विचार नाही. आत्मचिंतन म्हणजे मनातल्या विकार आणि दुर्विचारांचं मूळ शोधून त्यांच्या उद्भवापलीकडची प्रशांती शोधणं. श्वासाकडे लक्ष केंद्रित करून मन हळूहळू स्वस्थ होतं. मनातली विकार-विलसिते मावळतात आणि आपोआप चैतन्याची यथार्थ जाणीव होते. मनाला तेजस्वीपणा येतो. हुरूप येतो. नैराश्य मावळतं!
हजार वर्षांपूर्वी शंकराचार्यानी मनाचं हे चैतन्य अथवा अद्वैतरूप जाणलं आणि हे चार शब्द सहज रचले. त्यासाठी त्यांना वंदन. मनमोराचा पिसारा फुलतो.. नाही मनात फुललेला दिसतो अशा आत्मचिंतनाच्या वाटेनं.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – इतिहास म्हणजे काय आणि त्याचा ‘आत्मा’!
‘‘व्यक्तींच्या हातून विशिष्ट कालीं व विशिष्ट स्थळीं घडलेल्या अनेक प्रसंगांचें मुद्देसूद, तपशीलवार, व व्यवस्थित वर्णन देतां देतां विशिष्ट कालीं व विशिष्ट देशांत कोणत्या महाविचाराची कशी उत्क्रांति झाली व काय परिणाम झालें, हें वर्तमान व भावी पिढय़ांना दाखवून देण्याचें भूत व वर्तमान इतिहासांचें मुख्य प्रयोजन आहें.. विशिष्ट काल, विशिष्ट स्थल व विशिष्ट व्यक्तींचें विशिष्ट आचरण ह्या तीन घटकांचा संघात झाला असतां प्रसंग ही वस्तू बनली जाते व अनेक प्रसंगांच्या व्यवस्थित संततीपासून इतिहास म्हणून ज्या वस्तूस म्हणतां येईल तिची निर्मिती होते.. ह्या विचारापासूनच वर्तमान व भावी पिढय़ांना गतकालीन पिढय़ांच्या कर्मसंततीचें ज्ञान होतें. कोणती कर्मसंतती घेऊन आपला समाज जन्माला आला आहे व कोणत्या दिशेचें आचरण ठेविलें असतां, वर्तमान व भावी समाजाचा कर्मलोप होऊन समाज आत्यंतिक सुखाचा वाटेकरी, कालान्तरानें का होईना, पण होईल हेंहि ह्या गतकालीन विचारापासून अंशत: कळूं लागतें.’’  
– इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘इतिहास म्हणजे काय?’ या निबंधात वरील चिंतन मांडले आहे. हा ‘इतिहासाचा आत्मा’ दाखवून देण्याचे अवघड काम महाराष्ट्रातील कोणाही इतिहासकाराला यथास्थित जमलेले नाही हे सांगत त्यासाठी काय करावे लागते त्याविषयी राजवाडे लिहितात –
‘‘राष्ट्रांतील मोठमोठय़ा व्यक्तींचीं चरित्रें म्हणजेच राष्ट्राचा इतिहास होतो, असें एक विधान आहे व तें बव्हंशीं खरें आहे. व्यक्ती ह्य़ा समाजाच्या घटक होत व मोठय़ा व्यक्ती समाजाचे मोठे घटक होत. अर्थात् मोठय़ा व्यक्तींचीं चरित्रें कांहीं एका अंशानें समाजाचा इतिहास होत.. लहान व्यक्तींचीं चरित्रें व मोठय़ा व्यक्तींचीं चरित्रें मिळून समाजाचा संपूर्ण इतिहास होतो. समाजांत मोठय़ा व्यक्ती केव्हांहि थोडय़ा असल्यामुळें मोठय़ा व्यक्तींच्या इतिहासाला लहान व्यक्तींच्या म्हणजे बहुजनसमाजाच्या इतिहासाचा जोड द्यावा लागतो. केवळ मोठमोठय़ा व्यक्तींच्याच चरित्रानें समाजाचा इतिहास संपूर्ण होत नाहीं..’’