जंगली कापसाच्या जातींमध्ये तंतू पूर्णपणे भरीव वृत्तचितीसारखे असतात. त्यांच्या मध्यभागी पोकळ नलिका नसते. यामुळे या तंतूंचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो.
सूतकताईच्या वेळी तंतू एकत्र व जवळजवळ राहणे कठीण जाते. याशिवाय या तंतूंचा लवचीकपणाही कमी असतो. या सर्वामुळे जंगली कापसाच्या तंतूंपासून सूत काढणे कठीण असते व काढलेल्या सुताचा दर्जाही समाधानकारक नसतो.
जंगली कापसाची झाडे ही बहुवार्षकि म्हणजेच अनेक वष्रे टिकणारी असतात. त्यांची लागवड दर वर्षी करावी लागत नाही. झुडूप किंवा लहान वृक्ष असे त्यांचे स्वरूप असते. सुरुवातीला मशागती कापूस हा जंगली कापसापासूनच विकसित केला गेला असल्यामुळे सुरुवातीच्या मशागती कापसाची झाडे ही बहुवार्षकि होती; पण चांगली मशागत केल्यामुळे झाडाला अधिक बोंडे लागू लागली व बोंडावरील तंतूंची संख्याही वाढली. याशिवाय मशागती कापसाच्या तंतूंच्या लांबीमध्येही विलक्षण सुधारणा झाली. याप्रमाणे मशागोती कापसाचे उत्पादन व दर्जा जंगली कापसापेक्षा किती तरी पटीने वाढला. सुरुवातीचा मशागती कापूस हा जंगली कापसापासून विकसित केल्यामुळे त्या वेळी मशागती कापसाची झाडेही बहुवार्षकि होती. शेतामध्ये ही झाडे अनेक वष्रे टिकत असत; परंतु नंतर हे लक्षात आले की, पहिल्या लागवडीनंतर जसजशी वष्रे जातात तसतशी प्रत्येक वर्षी तंतूंचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही कमी कमी होत जातात. अशा प्रकारची कापूस लागवड किफायतशीर होत नाही. म्हणून वार्षकि किंवा हंगामी जाती विकसित केल्या गेल्या. हंगामी कापसाची लागवड दरवर्षी करावी लागते. एकदा कापसाचे पूर्ण पीक घेतल्यावर जुनी झाडे काढून टाकावी लागतात.  जुनी झाडे काढून टाकून पुढील लागवडीपूर्वी जमिनीची मशागत केली जात असल्यामुळे झाडावर वाढणारे तसेच जमिनीतील रोग व जंतू नाहीसे होतात व ते पुढील हंगामातील पिकाला बाधक ठरण्याचा धोका नसतो. ही बाब थोडीशी खर्चीक असली तरी हंगामी कापसापासून मिळणारे उत्पादन हे बहुवार्षकि कापसापेक्षा किती तरी पटीने अधिक असते.  कापसाच्या तंतूंची गुणवत्ता वर्षोनुवष्रे समान राहते. यामुळे हंगामी जातीच्या कापसाच्या जाती अधिक लोकप्रिय झाल्या. आज जगभर उत्पादित केला जाणारा कापूस हा हंगामी पद्धतीचाच आहे.
– चं. द. काणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ‘टोडी फतेहपूर’ची मंदिरे
टोडी फतेहपूरच्या अभेद्य किल्ल्यात भुयारी गुप्त मार्गाचे जाळेच होते. किल्ल्यातील राजांचे निवासस्थान रंगमहाल पॅलेस हा चार मजली महाल, सध्याचे त्यांचे वारस वापरतात. रंगमहालाशिवाय राजगढ पॅलेस, गुसाई महाल, रतनवास महाल हे भव्य राजवाडे होते. किल्ल्याच्या आवारातच राम व जानकी यांचे पाच मजली भव्य मंदिर आणि त्यातील रामायण, महाभारतातील घटनांची रंगचित्रे आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
टोडी या गावातील हा किल्ला मोगल लोक भारतात येण्यापूर्वी गुसेन या लुटारू जमातीच्या ताब्यात होता. टोळी टोळीने घोडे आणि उंटावरून डाके घालणाऱ्या या जमातीचा म्होरक्या होता गुसेन सुन डोगरा. १७३१ साली बुंदेला राजा हिंदुपत याने आक्रमण करून हा किल्ला घेतला. हिंदुपतने टोडी गावाचे नाव टोडी फतेहपूर असे करून राज्याचा विस्तार करून एक संपन्न राज्य बनविले.
राजा हरिप्रसाद या कलांचा भोक्ता असलेल्या राजाने वृंदावन, चित्रकूट, बिठूर, अयोध्या येथे अनेक मंदिरे बांधली. हिंदुपतने हा किल्ला घेताना लुटारूंचा नेता सुन जोगरा मारला गेला. त्यावेळी त्याच्या वृद्ध मातेने हिंदुपतला शाप दिला की, तुझ्या पुढच्या सात पिढय़ांमध्ये कोणालाही मूलबाळ होणार नाही. हा शाप जणू खरा ठरून, टोडी फतेहपूरच्या पुढच्या सात पिढय़ांतील दत्तक वारसानंतर रघुराजसिंग हा जन्माला आला. त्याची कारकीर्द १९४२ ते १९६४ या काळात झाली आणि त्याने एक जानेवारी १९५० रोजी आपल्या राज्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण केले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com