भारतात आलेल्या अनेक परदेशस्थांनी इकडे येऊन विविध प्रकारचे जगावेगळे छंद जोपासले, तसेच काहींनी जगावेगळे व्यवसाय शोधून काढले. त्यापैकी एक आहेत रोम्युलस व्हिटेकर. रोम्युलस ओळखले जातात ते त्यांनी चेन्नईमध्ये उभे केलेल्या स्नेक पार्क म्हणजे सर्पोद्यानामुळे! पर्यावरण संवर्धनतज्ज्ञ म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळवलेल्या रोम्युलस अर्ल व्हिटेकर यांचा जन्म १९४३ सालचा, अमेरिकेतील न्यूयॉर्कमधला. रोम्युलसच्या लहानपणीच वडील अर्ल कुटुंबापासून विभक्त झाल्यावर रोम्युलस ऊर्फ रोम हा आई डोरीस नॉर्डनबरोबर न्यूयॉर्कमध्येच राहिला.

रोम्युलसला लहानपणीसुद्धा साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे किती आकर्षण होते याबद्दल एक किस्सा सांगण्यासारखा आहे. न्यूयॉर्कच्या एका शाळेत शिकत असताना मधल्या सुटीत मुलं शाळेशेजारी चाललेल्या बांधकामाच्या ठिकाणी पडलेल्या दगड-मातीच्या ढिगाऱ्यावर चढून, तिथे उडणारी फुलपाखरं धरणं, कोळी/कीटक/अळ्यांना काडीनं टोचणं वगैरे खेळ खेळत होती. रोम्युलस एका फुलपाखराला पकडू पाहात असताना दगडांमधून दोन फूट लांबीचा एक साप सळसळत वर आला. रोम्युलसने मग फुलपाखरू सोडून तो सापच धरला आणि आपल्या स्कूलबॅगमध्ये भरला! शाळेतून घरी आल्यावर त्याने तो विषारी नसलेला अमेरिकन ‘गार्डन स्नेक’ आपल्या आईला दाखवला. रोम्युलससारखीच त्याची आई! ती उद्गारली ‘काय सुंदर साप आणलास तू!’ तिने मग तो साप घरातील अ‍ॅक्वेरियम कोरडे करून त्यात ठेवला! आणि वर कडी म्हणजे तिने सापांविषयीचे माहितीचे शास्त्रीय पुस्तक त्याला आणून दिले!

पुढे रोम्युलसची आई मुलांना घेऊन भारतात तामिळनाडूत स्थायिक झाली. कोडाइकॅनाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोम्युलसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते अमेरिकन लष्करात दाखल झाले आणि दोन वर्षे व्हिएतनाम युद्धात लढले. पुढे ते तीन वर्षे मायामी सर्पेटेरियम येथे बिल हास्ट यांच्याकडे विविध सापांना हाताळणे, त्यांचा संकर आणि पालन वगैरे शिक्षणासाठी राहिले. या शिक्षणानंतर पॅसिफिक वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून ‘वाइल्डलाइफ मॅनेजमेंट’ हा विषय घेऊन बी.एस्सी. शिक्षणक्रम पूर्ण करून ते पुन्हा भारतात, चेन्नईत आले.

सुनीत पोतनीस –sunitpotnis@rediffmail.com