एक ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणजे मिशनरी म्हणून भारतात आलेले विल्यम कॅरे यांनी त्यांच्या ४१ वर्षांच्या बंगालमधील वास्तव्यात धर्मप्रसार आणि धर्मातराचे कार्य दुय्यम मानून भारतीय समाजाच्या उत्कर्षांसाठी स्वतला वाहून घेतले. मिशनरी कार्याबाबतच्या कॅरे यांच्या कल्पना तत्कालीन जगाच्या अनेक शतके पुढे होत्या. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते ‘फादर ऑफ मॉडर्न मिशन’ म्हणून ओळखले जातात!

१७९३ साली ते प्रथम कलकत्त्यात आले आणि १८३४ साली मृत्यूपर्यंत एक भारतीय बनून राहिले, मायदेशी परतलेच नाहीत! बंगालमधील वास्तव्यात त्यांनी भारतीय जीवनशैली स्वीकारून ते स्थानिक लोकांशी पूर्णपणे समरस झाले. मिशनचे काम करताना व्यापक दृष्टिकोन ठेवून या मिशनऱ्याने धर्मातरे आणि धर्मप्रसार कमी केला, पण अनेक सामाजिक सुधारणांसाठी पुढाकार घेतला.

सतीची अनिष्ट प्रथा बंद होण्यासाठी सुरुवातीचे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये कॅरे होते. विधवा विवाहांना उत्तेजन देऊन स्त्री भ्रूणहत्या बंद होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कॅरे यांनी स्त्री शिक्षणासाठी मुलींसाठी खास शाळा सुरू केल्या.

तत्पूर्वी बंगाल, ओरिसात अनेक ठिकाणी महारोग्यांना जिवंतपणीच दहन करण्याची किंवा जमिनीत पुरण्याची क्रूर प्रथा होती. विल्यम कॅरे यांच्या अथक प्रयत्नांनी ही प्रथा बंद केली गेली. बंगालमधील शेतजमिनींचे सर्वेक्षण करून कॅरे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे सल्ले देऊन, पडीक जमीन लागवडीखाली आणली. बंगाल, ओरिसातल्या सामान्य माणसाला सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी बँका सुरू करायचा कानमंत्र देऊन शेतकरी आणि मध्यमवर्गाची सावकारी जाचातून मुक्तता केली. पौर्वात्य भाषेत पहिले वर्तमानपत्र सुरू करणारे विल्यम कॅरेच!

बहुतेक सर्व भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करणाऱ्या कॅरे यांनी रामायणाचे इंग्रजीत भाषांतर करून भारतीय ज्ञानाचे भांडार युरोपियन लोकांसाठी खुले केले. कॅरे यांच्या मिशनरी कार्यशैलीमुळे त्यांना स्वप्नात रमणारा (युरोपियन) मिशनरी म्हणून त्यांचे सहकारी मिशनरी त्यांची चेष्टा करीत. त्यावर त्यांचे एकच उत्तर असे – ‘‘एक्स्पेक्ट ग्रेट िथग्ज फ्रॉम गॉड, अटेम्प्ट ग्रेट िथग्ज फ्रॉम गॉड!’’ पुढे त्यांच्या प्रोटेस्टंट मिशनचे हे ब्रीदवाक्यच बनले! फादर विल्यम कॅरे यांचे निधन श्रीरामपूर येथे ९ जून १८३४ रोजी झाले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com