04 August 2020

News Flash

कुतूहल : जागतिक पाणथळ-भूमी दिन

दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘वर्ल्ड वेटलँड्स डे’ अर्थात जागतिक पाणथळ-भूमी दिन म्हणून साजरा केला जावा,

१९७१ साली इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरी ‘पाणथळ प्रदेशांचे महत्त्व’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वाना समजावे या हेतूने दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘वर्ल्ड वेटलँड्स डे’ अर्थात जागतिक पाणथळ-भूमी दिन म्हणून साजरा केला जावा, असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. १९९७ सालापासून हा दिवस साजरा केला जात आहे.

नदी, तलाव, सागरकिनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या आणि गवतांनी व झुडपांनी (खारफुटी) भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. आपण भूगर्भातील पाणी वापरतो; या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानीकारक द्रव्ये अशा प्रदेशांत फेकतो; परंतु पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.

बदके, करकोचे, खंडय़ा, बगळे, रोहित तसेच शिकारी प्रजातींच्या अनेक पक्ष्यांना पाणथळ भूमीतून अधिवास मिळतो. हे पक्षी या अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा ठरतात. ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी २० हजारांपेक्षा जास्त पक्षी आढळतात तसेच त्या ठिकाणचे भौगोलिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे स्थान असल्यास, अशा ठिकाणांना ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होतो. महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला लवकरच ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होणार असून, राज्यातील हे पहिले ठिकाण ठरणार आहे!

– रुपाली शाईवाले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 2:20 am

Web Title: world wetlands day impacts of climate change zws 70
Next Stories
1 मनोवेध : मनाच्या बचाव यंत्रणा
2 सुप्त मनातील विचार
3 सहावा वस्तुमान लोप
Just Now!
X