हिंदुस्थानात आलेल्या सुरुवातीच्या परकीयांपैकी स्थानिक भाषा आत्मसात करून त्यांच्यात पांडित्य मिळवणाऱ्यांत ख्रिश्चन मिशनरी अग्रेसर होते. त्यातील अनेकांनी त्या भाषांमध्ये ग्रंथलेखन केले आणि छपाईयंत्र हिंदुस्थानात आणून स्थानिक भाषेतील पहिली ग्रंथछपाईही या मिशनऱ्यांनीच केली! काही मिशनऱ्यांनी तर आपले ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम बाजूला सारून स्थानिक भाषांमधील साहित्य लेखन, संकलन आणि व्याकरणाचे सुसूत्रीकरण या कामालाच स्वत:ला वाहून घेतले!

खरं तर या मिशनऱ्यांनी स्थानिक भाषा शिकून त्यांत साहित्यनिर्मिती केली यामागचा त्यांचा अंत:स्थ हेतू धर्मप्रसार हाच होता. पोर्तुगीजांनी सुरुवातीला केरळ आणि गोव्यातल्या लोकांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून, काही वेळा सक्ती आणि छळ करून ख्रिस्ती धर्म स्वीकारावयास लावला. परंतु या मार्गाने पोर्तुगीजांना हवे तसे यश मिळाले नाही. धर्मप्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी बिशपांच्या प्रांतिक सभा म्हणजे कौन्सिल भरत असत. इ.स. १५८५ मध्ये भरलेल्या कौन्सिलने एक मार्गदर्शक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार गोव्यातल्या मिशनऱ्यांनी गोव्याची भाषा म्हणजे कोकणी आणि मराठी भाषा आत्मसात करून ख्रिस्ती धर्माची तत्त्वे विशद करणाऱ्या लहान प्रश्नोत्तर रूपातल्या पुस्तिका आणि इतर विषयांवरचे ग्रंथ तयार केले. त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी कोकणी आणि मराठी भाषा शिकून लोकांशी या भाषांमध्येच संभाषण सुरू केले.

गोव्यात प्रथम १५१० साली डोमिनिकन पंथाचे मिशनरी आले. नंतर पुढे १५१७ मध्ये फ्रान्सिस्कन आले आणि १५४२ मध्ये फ्रान्सिस झेवियर हा जेसुइट मिशनरी आला. झेवियरने मलबारात आणि गोव्यात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी एका दुभाषाकडून स्थानिक भाषेत प्रश्नोत्तरावलींचे भाषांतर करवून घेतले. झेवियर प्रचारासाठी जाई तेव्हा घंटा वाजवून लोकांना गोळा करी आणि मोडक्यातोडक्या मल्याळी भाषेत धर्मोपदेश करी. झेवियर स्थानिक भाषा शिकला नाही याबाबत लोक एक अद्भुत कारण सांगतात. ते असे की फ्रान्सिसला बहुभाषिकत्वाची देणगी मिळाली होती. तो जाई तिथे पोर्तुगीज भाषेतच बोलत असे, पण लोकांना मात्र त्यांच्या स्थानिक भाषेतच ऐकू जाई!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com