आफ्रिका खंडातील पूर्वेकडचा दक्षिण सुदान हा एकविसाव्या शतकात निर्मिती झालेला दुसरा स्वायत्त देश. संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेला हा जगातला १९३ वा, तर आफ्रिका खंडातला ५५ वा देश आहे. ९ जुलै २०११ रोजी दक्षिण सुदान एक स्वायत्त देश बनला. तोच त्या देशाचा स्वातंत्र्य दिन!

दक्षिण सुदानने झगडून स्वातंत्र्य मिळवले ते कोणत्याही परकीय सत्तेकडून नाही, तर ते मिळवले त्यांच्याच सुदान या मूळ देशाकडून! मूळच्या सुदानपासून दक्षिण सुदान निराळा निघण्यामागच्या कारणांपैकी धार्मिक भिन्नता हे महत्त्वाचे कारण आहे. दक्षिण सुदान या नवदेशाच्या उदयामागच्या घटनाक्रमांची माहिती करून घेताना मूळच्या सुदान या देशाचा संक्षिप्त इतिहास माहिती करून घेणे सयुक्तिक ठरेल.

सुदानच्या उत्तरेला लागून असलेल्या इजिप्तचा सुदानी जनतेवर नेहमीच प्रभाव राहिला. एकोणिसाव्या शतकाअखेर मुहम्मद माहदी यांनी उत्तर सुदानात इस्लामी सुधारणांच्या उद्देशाने संघटना स्थापन केली. थोड्याच काळात माहदी यांनी तिथले सरकार उलथवून सुदानवर माहदी सरकारचा अंमल बसवला. पुढे इजिप्त आणि त्याचा पाठीराखा ब्रिटन यांचा माहदी सरकारशी संघर्ष सुरू होऊन झालेल्या युद्धात माहदी पराभूत झाला. ब्रिटन आणि इजिप्तने सुदानचा कब्जा १८९९ साली घेतला. इ.स. १८९९ ते १९५५ या काळात सुदानवर ब्रिटन आणि इजिप्त यांचा संयुक्त अंमल होता. सुदानमध्ये चाललेल्या यादवींमुळे ब्रिटिशांनी सुदानवरचा त्यांचा अंमल १९५६ मध्ये बरखास्त केला.

ब्रिटिशांनी सुदानवरचा अंमल काढल्यावर तिथे अरब नेतृत्वाचे सरकार आले. सुदानच्या उत्तर प्रदेशातील जनतेपैकी बहुतांश इस्लाम धर्मीय आणि दक्षिणेतील बहुतेक लोक ख्रिस्ती धर्मीय आहेत. तसेच त्यांच्या संस्कृतीत आणि जीवनशैलीतही मोठी भिन्नता आहे. या गोष्टींमुळे उत्तर आणि दक्षिण सुदानच्या जनतेत नेहमीच संघर्ष होत राहिला.

उत्तर सुदानमध्ये असलेले खार्टूम (खाटूम) हे सुदानी सरकारचे राजधानीचे शहर. येथील अरब वर्चस्वाखालील सरकारने दक्षिणेतील लोकांना सरकारमध्ये सहभाग न देता, दक्षिण सुदानला राज्यसंघ पद्धतीचे सरकार देण्याचा निर्णय त्यांच्या इच्छेविरुद्ध घेतला. येथूनच पुढे उत्तर आणि दक्षिण सुदानमध्ये होणाऱ्या हिंसक आणि गंभीर संघर्षाला तोंड फुटले. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com