लॅन्थनाइड कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच यिटर्बअिम सुद्धा मोनाझाइट, गॅडोलीनाइट, यूक्झेनाइट, झिनोटाइम यासारख्या खनिजांवरील अभ्यासात शोधला गेला. त्याचे नाव स्वीडनमधील यिट्रिया गावावरून ठेवले गेले. १८७८ मध्ये जीनिव्हा विद्यापीठात जिन चार्ल्स गॅलिसार्ड डी मॅरिनॅक असे भले मोठे नाव असलेल्या संशोधकाने यिटर्बअिम -ऑक्साइडचा शोध लावला. अठ्ठावीस वर्षांनंतर कार्ल ऑयर वॉन वेल्सबॅकने यिटर्बअिम धातू मिळवला. अतिशय शुद्ध यिटर्बअिम धातू मिळायला मात्र रसायनशास्त्राच्या अभ्यासकांना १९५३ पर्यंत वाट पाहावी लागली. लॅन्थनोथर्मिक पद्धतीने यिटर्बअिम-ऑक्साइडची लॅन्थनम धातू बरोबरीच्या टॅन्टलमच्या रसपात्रात (Crucible) केलेल्या अभिक्रियेतून शुद्ध यिटर्बअिम धातू मिळाला. प्रामुख्याने मोनाझाइट, (ज्यात जेमतेम ०.०३ टक्के इतक्या कमी प्रमाणात असूनसुद्धा) यिटर्बअिम धातू प्राप्त केला जातो. भारतातदेखील उत्कृष्ट दर्जाच्या यिटर्बअिम धातूचे उत्पादन होते.

शुद्ध यिटर्बअिम हा चुंदेरी, चमकणारा, मृदू धातू आहे, तसेच वर्धनीय आणि तन्यही आहे. तीव्र खनिज तेलात यिटर्बअिम विद्राव्य आहे. थुंड पाण्याबरोबर याची संथगतीने अभिक्रिया होते तर गरम पाण्याबरोबर अभिक्रियेचा वेग वाढतो, मात्र आम्लातील यिटर्बअिमची अभिक्रिया जलद असते आणि त्यात हायड्रोजन वायू तयार होतो. हवेत ठेवल्यास संथगतीने ऑक्सिडेशन होते. रासायनिकदृष्टय़ा यिटर्बअिम स्थिर असला तरी हवा आणि बाष्पाच्या संपर्कात येऊ नये म्हणून तो निष्क्रिय वातावरणातील पेटीत ठेवला जातो.

यिटर्बअिमची तीन अपरूपे आहेत. त्यांना ग्रीक अक्षरे अल्फा, बीटा, गॅमा यावरून नावे देण्यात आली आहेत. यिटर्बअिम हा चुंबकीय गुणधर्मात इतर लँथनाइड्सपेक्षा वेगळा आहे, एक केल्विन तापमानाच्या वर हा पॅरामॅग्नेटिझ्म गुणधर्म दाखवतो. या बाह्य़ चुंबकीय क्षेत्र जवळ असेल तर यिटर्बअिम चुंबकीय गुणधर्म दाखवतो, बाह्य़ चुंबकीय क्षेत्रापासून यिटर्बअिम दूर होताच चुंबकत्व नाहीसे होते.

पर्यावरणाच्या वा जैवरासायनिक दृष्टीने यिटर्बअिम खूपसा त्रासदायक नाही पण या धातूची भुकटी विस्फोटक ठरू शकते. इतर अनेक लॅन्थनाइड्सप्रमाणे मिश्र धातू मिळवण्यासाठी व लेझरमध्ये यिटर्बअिम उपयोगी पडते. औद्योगिक क्षेत्रात उत्प्रेरक म्हणून यिटर्बअिम वापरला जातो. आधी वापरात असलेले इतर उत्प्रेरक जे अपायकारक सिद्ध झाले त्यांना यिटर्बअिम हा उत्तम पर्याय ठरला. माहिती साठवण्याच्या (memory devices) उपकरणांमध्ये तसेच आण्विक घडय़ाळांमध्येही यिटर्बअिम वापरला जातो.

– डॉ. रवींद्र देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org