16 January 2019

News Flash

इट्रिअम

जॉन गॅडोलीनला १७८९मध्ये गाडोलीनाइट खनिजाचे विश्लेषण करताना इट्रिअमचा शोध लागला.

जॉन गॅडोलीनला १७८९मध्ये गाडोलीनाइट खनिजाचे विश्लेषण करताना इट्रिअमचा शोध लागला. स्विडनच्या इटर्बीनामक छोटय़ा नगरीवरून चार मूलद्रव्यांना नावे मिळाली त्यापकीच एक, संक्रमण धातूंच्या दुसऱ्या श्रेणीतील पहिले मूलद्रव्य – इट्रिअम! चंदेरी रंगाचे हे मूलद्रव्य रासायनिकदृष्टय़ा मात्र लँथेनाइड गणातील मूलद्रव्यांशी साधम्र्य दाखवते. इट्रिअम निसर्गात मुक्त स्वरूपात आढळत नसून नेहमी इतर दुर्मीळ मृदा खनिजांबरोबर आढळते. अपोलो अभियानाच्या मोहिमेत चंद्रावरील खडकात इट्रिअम विपुल प्रमाणात आढळले होते.

इट्रिअमवर ऑक्सिडेशनमुळे एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे सामान्य तापमानाला त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही, परंतु उच्च तापमानाला मात्र त्याचे ऑक्सिडीकरण होऊ शकते. ४०० अंश सेल्सिअस तापमानाला चुऱ्याच्या स्वरूपातील इट्रिअम पेट घेऊ शकते.

इट्रिअम ऑक्साइड या संयुगाचे अनेक उपयोग आहेत. रंगीत दूरचित्रवाणी संचाच्या टय़ूबसाठी लागणाऱ्या लाल फॉस्फरसच्या निर्मितीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. अ‍ॅल्युमिनिअम व मॅग्नेशिअमच्या संमिश्रात मजबुतीकरणासाठी इट्रिअम मिसळतात. धातू हे उष्णतेचे उत्तम वाहक असतात, परंतु अ‍ॅल्युमिनिअम, इट्रिअम व क्रोमिअम यांचे संमिश्र मात्र उष्णतेचे रोधक म्हणून कार्य करते. काचेला उष्णता व शॉक रोधक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशी काच कॅमेराच्या लेन्समध्ये वापरतात. सुपरकंडक्टर्समधील वाहकात, उत्प्रेरकाच्या निर्मितीसाठी व काचेला पॉलिश करण्यासाठी इट्रिअम योग्य असल्याचे आढळले आहे. मायक्रोवेव्ह फिल्टर्समध्ये इट्रिअम व लोह यांचे गान्रेट तर विविध प्रकारच्या कृत्रिम व हिरा सदृश रत्नांसाठी इट्रिअम व अ‍ॅल्युमिनिअम गान्रेट वापरले जाते, तसेच दागिन्यातील झिर्कोनियाचा घन आकार अबाधित राहावा म्हणूनही इट्रिअम वापरतात.

पर्यावरणातील इट्रिअमच्या वाढीव प्रमाणास मुख्यत: पेट्रोल शुद्धीकरणाचे उद्योगधंदे कारणीभूत असले तरी इतर कारणांचा प्रभाव दिसून येतो. घरगुती वापराच्या अनेक वस्तूत इट्रिअम असते उदा. रंगीत दूरचित्रवाणी संच, विजेची बचत करणारे दिवे, फ्लोरोसेंट दिवे इत्यादी. दिवसेंदिवस त्याचे नवनवीन उपयोग प्रकाशात येत आहेत. याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होताना दिसतो. निकामी झालेल्या या वस्तूंची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने न करता कचऱ्यात टाकून देण्याच्या प्रवृत्तीमुळे पाण्याचे स्रोत, जमीन व हवेच्या प्रदूषणात वाढ होताना दिसते. वेळीच पाऊल न उचलल्यास भविष्यात मानवाला आणि प्राण्यांना दुष्परिणाम भोगावे लागतील.

– श्रीमती मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on June 8, 2018 2:06 am

Web Title: yttrium chemical element