दूरवरच्या प्रदेशातून भारतीय द्विपकल्पात येऊन स्थायिक होऊन येथील विभिन्न प्रादेशिक संस्कृतींवर आपला प्रभाव टाकणाऱ्यांमध्ये मोगल आणि ब्रिटिश लोक सर्वात पुढे आहेत. आजही त्यांचा प्रभाव भारतीय जनमानसावर टिकून आहे. इ.स. १५२६ मध्ये आक्रमण करून उत्तर भारतात आपली सत्ता स्थापन करून पुढे ३०० हून अधिक वर्षे आपला अंमल टिकवणारे मोगल राज्यकत्रे आपलेच वाटावे इतके या प्रदेशात रममाण झाले! झहीरुद्दीन मुहम्मद ऊर्फ बाबर या तुर्की-मंगोलियन माणसाने प्रथम इब्राहीम लोदीचा पानिपतच्या पहिल्या युद्धात आणि राजपुतान्याच्या राणा संगाचा खानवा आणि चंदेरीच्या लढाईत पराभव करून दिल्लीत आपले राज्य स्थापन केले. पुढे या मोगल साम्राज्याचा मोठा विस्तार होऊन ब्रिटिशांचे इथे बस्तान बसेपर्यंत एक प्रबळ सार्वभौम सत्ता म्हणून ते नावारूपाला आले.

मोगल हा शब्द मुघल या पर्शियन शब्दाचा अपभ्रंश. पर्शियनमध्ये मंगोल किंवा मंगोलियन याला ‘मुघल’ हा शब्द आहे. हे मंगोल म्हणजेच मोगल यांचा जुजबी इतिहास इथे देणे सयुक्तिक ठरेल. मंगोल वंशाचे लोक हे मूळच्या उत्तर चीनमधील मंगोलियातले. मेंढी, बकरी, घोडे इत्यादी पशुपालन करून गुजराण करणारे, शांतताप्रिय आणि टोळ्यांनी राहणारे. तेमुजीन हा एक टोळी नायक. त्याने सर्व मंगोल टोळ्यांना एकत्र आणून सेना उभारली. लोकांनी त्याला ‘चेंगीझखान’ म्हणजे जगाचा शासक ही उपाधी दिली आणि पुढे त्याचे ते नाव झाले. त्याने उत्तर चीनचा मोठा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. चेंगीझखानाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू कुबलाई खानाने दक्षिण चीनचा बराच प्रदेश आपल्या कब्जात आणला. पण त्याच्या मृत्यूनंतर हे मंगोल राज्य चीनच्या राज्यसत्तेने पूर्ण बेचिराख करून टाकले. पुढच्या ३०० वर्षांत पूर्वीच्या मंगोल साम्राज्याचे चार स्वतंत्र भाग झाले. रशियाचा गोल्डन होर्ड, इराण-इराकची इल्खनत, पूर्वीचे कुबलाई खानचे युआन राज्य आणि बाबराचे मोगल साम्राज्य. १४ व्या शतकात कुबलाई खानाचा पुढचा वंशज तमूर याने चेंगीझखानाचे पूर्वीचे साम्राज्य उभारून त्याचा विस्तार एशिया मायनर ते हिंदुस्थान असा विशाल केला.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com