20 February 2019

News Flash

भारतीयांशी समरस झालेला समाज 

प्रदेशातून पलायन करून प्रथम सिंध आणि पुढे दक्षिण गुजरातेत आश्रय घेतला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आठव्या शतकात अरब मुस्लीम आक्रमकांनी इराणवर आपला अंमल बसवून इस्लाम कबूल न करणाऱ्या इराणी झोराष्ट्रियन लोकांचा छळ सुरू केला. छळामुळे त्रासलेल्या अनेक इराण्यांनी त्यांच्या प्रदेशातून पलायन करून प्रथम सिंध आणि पुढे दक्षिण गुजरातेत आश्रय घेतला. जदी राणाने दिलेल्या जमिनीवर, इराणमधून बरोबर आणलेल्या अग्निज्योतीचे मंदिर बांधून त्यांनी तिथे वसती केली. या जागेचे आणि वसतीचे नामकरण त्या इराण्यांनी ‘संजान’ असे केले तर तिथल्या स्थानिक गुजराती लोकांनी या इराण्यांना ‘पारशी’ म्हटले. तेव्हापासून हे निर्वासित आणि त्यांचा धर्म पारशी म्हणजे पíशयातून आलेला या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे हे पारशी दक्षिण गुजरातमध्ये सुरत, नवसारी वगरे ठिकाणी जाऊन राहू लागले. त्यांनी नंतर त्यांच्या अग्निदेवतेचे मंदिर नवसारीत बांधले. हे लोक पहिली आठशे वर्षे शेतीचा व्यवसाय करीत होते.

आठव्या शतकात भारतीय प्रदेशात येऊन राजा जदीराणा याच्या अटींप्रमाणे गेली तेरा शतके हे लोक गुजराती भाषेचा आणि लिपीचा वापर करतात, गुजराती स्त्रियांप्रमाणे यांच्या स्त्रिया पेहेराव करतात. पारशी लोकांचा मृदू स्वभाव, परोपकारी वृत्ती, त्यांचे शिष्टाचार आणि त्यांच्या श्रद्धा मूळ भारतीय लोकांशी जुळल्यामुळे हे लोक लवकरच भारतीय संस्कृतीत समरस होऊन भारतीयच झाले! मात्र आंतरधर्मीय विवाह न करून आणि अंत्यसंस्कारांची आपली वेगळी परंपरा राखून पारशी समुदायाने आपलं वेगळेपणही जोपासलंय! पारशी लोकांची वसती शहरांमध्येच आढळते.

जगात एकूण लोकसंख्या १,३८,००० असलेले पारशी भारतात संख्येने ५९,००० आहेत. यांच्या समाजातील कमी होत चाललेले जन्माचे प्रमाण आणि नोकरी व्यवसायासाठी होत असलेली स्थानांतरे या कारणामुळे त्यांची सातत्याने घटत चाललेली लोकसंख्या हा आता चिंतेचा विषय झालाय. १९०१ साली भारतातील पारशी समाज ९४ हजार होता, तर १९७६ साली घटून तो ५९ हजार झाला. याच वेगाने पारशी समाज कमी होत गेला तर २०२५ साली भारतातील त्यांची संख्या २५ हजारांहूनही खाली येईल अशी भीती आहे!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on February 1, 2018 1:53 am

Web Title: zoroastrianism religion in india