शहर म्हटले की नागरिकांना सोयीसुविधा पुरवणे अनिवार्य आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरी, वीज, पाणी, नैसर्गिक गॅसपुरवठा पाहिजे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट हवी, सांडपाणी प्रक्रिया सुविधा हवी आणि ही सगळी कामे करण्यासाठी जे कर्मचारी तैनात केले जातात त्यांची सुरक्षितता हे सारे शहरातील सुविधांअंतर्गत येतात. वीज २४ तास पुरवायची असेल तर त्यासाठी लागणारी यंत्रणा सुसज्ज ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यात ढिलाई किंवा कुचराई करून चालत नाही. या झाल्या नेहमीच्या सुविधा. स्मार्ट शहरांतील लोकांना भविष्यात काय सुविधा लागतील याचाही विचार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने करता येतो. एनर्जी ट्रॅकिंग तंत्रज्ञान या कामी उपयोगी येते. इंधनाचे नवे स्राोत शोधणे किंवा आहे त्याच इंधनांचा सुयोग्य वापर करण्याच्या पद्धतींचा अवलंब या विषयीच्या संकल्पना त्यातून प्राप्त होतात. काही प्रारूपे अशी आहेत की त्यांच्या वापराने स्थावर मालमत्ता विकासाची नवसंकल्पना मिळू शकते. नेमक्या कोणत्या वेळी मालमत्ता विक्री केल्याने हमखास व योग्य भाव मिळेल अशा वेळांची शक्यताही ही प्रारूपे वर्तवतात.

हेही वाचा >>> कुतूहल: स्मार्ट शहरे आणि नागरिकांची सुरक्षितता

वैज्ञानिकांनी यंत्र शिक्षण वापरून निर्मिती केलेले तंत्रज्ञान खास प्रकारे विश्लेषण करून आता किती व कोणती प्रदूषके आहेत आणि अगदी पुढील दोन तासांत ती प्रदूषके किती वाढतील याचा अंदाज देतात. या विश्लेषक पद्धतीने प्रशासनाला आधीच प्रदूषण नियंत्रित ठेवता येते.

प्रदूषण करणारा शहरातील आणखी एक घटक म्हणजे ओला आणि सुका कचरा. कचरा व्यवस्थापनातही आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते. कोणत्या कचऱ्याचा प्रक्रिया करून पुन्हा वापर करता येईल, यंत्र शिक्षण प्रणालीचा वापर करून उपलब्ध कचऱ्यापासून कोणत्या उपयुक्त वस्तू मिळवता येतील हेही जाणून घेता येते. सिडनी शहरात कचरा वेगळा करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ताचालित रोबॉट करतात. न्यूझिलंडच्या काही शहरांत तलावातील पाण्याचे निरीक्षण व विश्लेषण करण्याचे काम हंस पक्षाच्या आकारातील स्वयंचलित रोबॉट करतात. प्राप्त विश्लेषणाप्रमाणे पाण्याची गुणवत्ता निर्धारित केली जाते आणि योग्य ती कार्यवाही केली जाते. स्मार्ट शहरे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने स्थानिक पर्यावरणात होत असलेले किंवा होऊ घातलेले बदल, वैश्विक तापमान वाढीचे संभाव्य दुष्परिणाम यांचा अभ्यास नोंदवून उपाय अमलात आणण्याच्या सूचना देतात. आताचा व भविष्यातील वाढीव प्रदूषण स्तर यावर नियंत्रणासाठी काय उपाय आहेत त्यांचा अवलंब, तसेच किती ऊर्जा खर्च होणार आहे यांचे अंदाज घेऊन यंत्र शिक्षण प्रारूप आढावा समोर ठेवते.

– डॉ. किशोर कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader