– डॉ. सुधाकर आगरकर
पितळ हा एक मिश्रधातू आहे. यामध्ये तांबं आणि जस्त या दोन धातूंचं बेमालूम मिश्रण केलेलं असतं. या मिश्रधातूत साधारणपणे तीन भागांपैकी दोन भाग तांबं तर एक भाग जस्त असतं.
पूर्वीच्या काळी घरोघरी पितळी भांडी वापरली जात. परंतु हळूहळू त्यांच्यापेक्षा स्वस्त आणि अन्नाशी रासायनिक अभिक्रिया न करणार्या स्टेनलेस स्टीलने महिलांची मनं जिंकली आणि काळजीपूर्वक वापराव्या लागणार्या पितळी भांड्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
पितळी भांडी काळजीपूर्वक वापरण्यामागचं कारण काय? तर वर म्हटल्याप्रमाणे पितळ हे तांबं आणि जस्त या दोन धातूंचं संमिश्र! अन्न शिजवताना, अन्नात असलेल्या टोमॅटो, लिंबू किंवा चिंच अशा आम्लधर्मी पदार्थांशी तांब्याचा थेट संपर्क आल्याबरोबर रासायनिक क्रिया होऊन अन्नामध्ये शरीरास अपायकारक अशी रसायनं तयार होतात. त्यामुळे अन्नाची चवही बिघडते आणि पोषणमूल्यंही कमी होतात. यासाठीच तांब्याच्या भांड्याप्रमाणे पितळी भांड्यांवरही ‘कथिल’ या धातूचा लेप चढवतात. ज्याला आपण ‘कल्हई’ करण्याची प्रक्रिया म्हणून ओळखतो. पितळी भांड्यावरचा हा कथिलाचा लेप जराही गेलेला नाही ना, हे पाहात राहणं म्हणजेच पितळी भांडी काळजीपूर्वक वापरणं!
पण स्वयंपाकघरातून गच्छंती झालेल्या पितळी भांड्यांना हल्ली सन्मानपूर्वक परत आणलं जातंय. आरोग्याविषयी सतर्क झालेली आजची पिढी पितळी नव्हे तर सर्वच भांड्यांकडे अधिक डोळसपणे पाहतेय. त्यातच इतर सर्व प्रकारच्या भांड्यांपेक्षा, पितळ या मिश्रधातूमध्ये असलेल्या अनेक गुणांमुळे हळूहळू काही स्वयंपाकघरं पितळी भांड्यांनी सजू लागली आहेत.
पितळी भांड्यात उष्णता सगळीकडे सम प्रमाणात आणि जलद गतीने पसरते. म्हणूनच भांडं काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी जास्त गरम होऊन अन्न तळाला चिकटण्याची भीती नसते, शिवाय उष्णता सगळीकडे सारखी पसरत असल्यामुळे पदार्थ मंद आचेवरही उत्तम शिजतो. मंद उष्णतेवर शिजल्यामुळे, त्या अन्नपदार्थातली जवळजवळ ९३ टक्के पोषणमूल्यं सुरक्षित राहातात. सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याच्या तांब्याच्या गुणधर्मामुळे पितळी भांड्यात असलेलं अन्न बर्याच प्रमाणात जंतुविरहित असतं. अन्नाबरोबर पोटात जाणारे पितळेचे अतिसूक्ष्म कण, अन्नपचनाला विशेषत: ॲसिडीटीवर नियंत्रण ठेवायला मदत करतात. आपल्या शरीरात सूक्ष्म प्रमाणात तांबं आणि जस्त असण्याची गरज असते. पितळी भांड्यात शिजलेल्या अन्नात आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात तांबं आणि जस्त यांचा अर्क येतो. हे सगळे फायदे नजरेसमोर ठेवून भांडी हाताळण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जरा जास्तच मेहनत घ्यावी लागते. पण थोडा अभ्यास करून वापरावी लागली तरी चालेल, पण पितळी भांडी वापरू या अशी एक मनोवृत्ती हळूहळू वाढतेय, असं दिसतंय!
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
