– गिरीश घाटे
गाडीमध्ये बसताना आपण सीटबेल्ट लावतो. ती आपल्या सुरक्षेची पहिली पायरी असते. पण गंभीर अपघाताच्या वेळी प्रवाशाच्या समोरून एक पांढरी पिशवी क्षणार्धात उघडते आणि त्याला पुढे आदळण्यापासून वाचवते. तिलाच ‘एअरबॅग’ म्हणतात. पण ती इतक्या वेगानं कशी उघडते? आणि ती आपला जीव कसा वाचवते?
याचं उत्तर भौतिकशास्त्रात दडलं आहे. गाडी अचानक थांबली, तरी न्यूटनच्या जडत्वाच्या नियमानुसार प्रवाशाचं शरीर पुढे फेकलं जातं. अशा वेळी एअरबॅग क्षणार्धात उघडून डोकं स्टीअरिंग, डॅशबोर्ड किंवा काचेवर आदळण्यापासून वाचवते. त्यामुळे धक्क्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होते.
एअरबॅग उघडण्यामागे अत्यंत वेगवान इलेक्ट्रॉनिक प्रणाली काम करत असते. गाडीमध्ये ‘ॲक्सेलेरोमीटर’ आणि इतर अनेक सेन्सर म्हणजे संवेदक बसवलेले असतात. अपघात झाल्यावर हे संवेदक गाडीच्या वेगात अचानक झालेला बदल ओळखतात. ते लगेच एअरबॅग कंट्रोल युनिटला संदेश पाठवतात. अपघाताच्या तीव्रतेनुसार हे कंट्रोल युनिट काही मिलिसेकंदांत निर्णय घेतं आणि एअरबॅग उघडण्याचा आदेश देतं.
एअरबॅगच्या आत विशेष रसायनं ठेवलेली असतात. अपघाताची खात्री होताच नियंत्रण-यंत्रणा एका विद्युत ठिणगीच्या साहाय्यानं ही रसायनं क्षणार्धात तापवते. त्यामुळे त्यांची रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात नायट्रोजन वायू तयार होतो. हा वायू अवघ्या ३० ते ४० मिलिसेकंदांत एअरबॅग पूर्णपणे फुगवतो. म्हणजे डोळ्याची पापणी लवण्याच्या आत एअरबॅग प्रवाशाच्या संरक्षणासाठी सज्ज होते. विशेष म्हणजे एअरबॅग कायम फुगलेली राहत नाही. प्रवाशाचे शरीर तिच्यावर आदळताच त्यातील वायू छोट्या छिद्रांतून बाहेर पडतो. त्यामुळे एअरबॅग मऊ गादीप्रमाणे दाबली जाते आणि धक्का अधिक सुरक्षितपणे शोषला जातो.
आधुनिक गाड्यांमध्ये समोरील एअरबॅगबरोबरच साइड एअरबॅग, कर्टन एअरबॅग, नी एअरबॅग आणि काही गाड्यांमध्ये सेंटर एअरबॅगही असतात. त्यामुळे अपघाताच्या दिशेनुसार योग्य एअरबॅग उघडते आणि प्रवाशांचं संरक्षण होतं.
मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. एअरबॅग ही सीटबेल्टला पर्याय नाही. ती सीटबेल्टबरोबरच प्रभावीपणे काम करते. सीटबेल्ट लावलेला नसल्यास अपघाताच्या वेळी प्रवाशाचं शरीर पुढे सरकतं. त्याच क्षणी वेगानं उघडणारी एअरबॅग त्याच्यावर आदळू शकते. त्यामुळे एअरबॅगने संरक्षण होण्याऐवजी इजा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच सीटबेल्ट आणि एअरबॅग या एकमेकांना पूरक अशा सुरक्षा व्यवस्था आहेत.
म्हणून पुढच्या वेळी गाडीत बसाल तेव्हा सीटबेल्ट लावायला विसरू नका. एअरबॅग तुमच्या सुरक्षेसाठी सज्ज असते, पण तिचं काम प्रभावीपणे होण्यासाठी सीटबेल्टची साथ तितकीच आवश्यक असते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
