– रश्मी सहस्रबुद्धे
स्वयंपाकघरातील भांडी हा अनेक गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बाजारात आलेलं किंवा पाहिलेलं प्रत्येक भांडं आपल्याकडे हवं असं अनेक जणींना वाटत असतं. काही वेळेस तांबं, पितळ, ॲल्युमिनियम, स्टील, नॉनस्टिक असा प्रवास करत पुन्हा अष्मयुगात म्हणजेच मातीच्या भांड्यांकडे आपण जात आहोत असं वाटतं.
काही वर्षांपूर्वी तांब्या-पितळीच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. चांदीप्रमाणे चकाकणारी, हलकी, स्वच्छ करायला सोपी अशी ॲल्युमिनियमची भांडी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या स्वयंपाकघरात विराजमान झाली. कालांतराने त्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आणि सध्या स्टीलची भांडी बहुतांश घरात वापरण्यात येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲल्युमिनियमची भांडी खरंच सुरक्षित आहेत का, ही अनेक संशोधनांमुळे निर्माण झालेली शंका!
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार या धातूचा वापर काही ठरावीक प्रकारची काळजी घेतली तरच पूर्णपणे सुरक्षित आहे, अन्यथा अत्यंत धोकादायक आहे. भांड्यांसाठी ॲल्युमिनियम वापरणं योग्य आहे पण त्याच वेळेस असंही सांगितलं आहे की आंबट म्हणजेच आम्लयुक्त पदार्थ अशा भांड्यांत उकळू नका, साठवू नका किंवा शिजवू नका. कारण ॲल्युमिनियम या धातूचा अन्नपदार्थांशी रासायनिक संयोग होऊ शकतो. ॲल्युमिनियम हा धातू क्रियाशील आहे. त्याचा विलयबिंदू उच्च असून तन्यता आणि वर्धनीयताही उच्च प्रतीची आहे. पण तो शरीरात जास्त प्रमाणात गेला तर हाडं ठिसूळ होणं, मेंदूच्या कार्यावर परिणाम होणं अशा गोष्टी संभवतात. मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांनी तर याचा वापर पूर्णपणे टाळावा.
अशा उलट-सुलट चर्चांमुळे ‘ॲल्युमिनियम वापरणं नको’ या मतावर आपण येतो आणि आपल्या मनात भीती निर्माण होते. पण शास्त्रीय पद्धतीने विचार केला तर ही भांडी कधी आणि कशी वापरावीत हे निश्चित ठरवता येतं. पदार्थांत जर टोमॅटो, चिंच, दही, लिंबू यांचा वापर असेल तर याचा वापर टाळावा म्हणजे प्रथम आमटीचं पातेलं बदला. बाकी वापरासाठी म्हणजे पाणी गरम करण्यासाठी, ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये स्टीलची भांडी किंवा इडली स्टॅन्डसारखी उपकरणं वापरायला हरकत नाही. कोरडे पदार्थ साठवण्यासाठी ॲल्युमिनियमचे डबे वापरणं सुरक्षित आहे. त्यातही ॲल्युमिनियमवर लेप चढवलेली भांडी वापरल्यास आपण ती घासण्यासाठी खरखरीत घासणी वापरतो. त्यामुळे भांड्यावर ओरखडे पडतात व त्यातून ॲल्युमिनियम धातू पदार्थाच्या संपर्कात येऊन त्याचा धोकादायक परिणाम होऊ शकतो. तेव्हा अशी भांडी घासतानाही विशेष काळजी घ्यावी. अशी काळजी घेतल्यास ॲल्युमिनियमची भांडी वापरायला हरकत नाही.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
