डॉ. श्रीकांत कार्लेकर
जगातली सर्वांत मोठी प्रवाळ भित्तिका प्रणाली (कोरल रीफ सिस्टिम) ईशान्य ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड किनारपट्टीलगत असून ती ‘महा अवरोधक भित्तिका’ (ग्रेट बॅरियर रीफ) या नावाने ओळखली जाते. जवळपास २,३०० किमी लांब पसरलेल्या प्रवाळ भित्तिकांच्या या समूहाने सागरतळाचे अंदाजे साडेतीन लाख चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे. या प्रणालीत २,९००पेक्षा अधिक प्रवाळ भित्तिका (कोरल सी) असून त्यामुळे जवळजवळ ९०० प्रवाळ बेटे निर्माण झाली आहेत. ही प्रवाळ प्रणाली जिथे विकसित झालेली आहे त्या समुद्राला ‘प्रवाळ समुद्र’ असे नाव मिळाले आहे. एका १६० किमी रुंद आणि ६० मी. खोल चॅनल ही प्रवाळप्रणाली किनारपट्टीपासून विलग झाली आहे.

प्रवाळ हा एका वैशिष्ट्यपूर्ण सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांचा वर्ग आहे. या वर्गातले प्राणी आपल्या शरीराभोवती कॅल्शियम कार्बोनेटचे कवच बनवतात. ते समुदायाने राहातात. समुदायातल्या प्रत्येक प्राण्याचे कवच हे सभोवतालच्या प्राण्यांच्या कवचांना चिकटलेले असते. प्रजनन झाले, की नवीन पिढीतले प्राणीही या वसाहतीला चिकटून आपली कवचे तयार करतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे होत राहिली की हळूहळू सर्व कवचे मिळून एक प्रकारचा चुनखडक (लाइमस्टोन) तयार होतो. भूविज्ञानात या चुनखडकाला जैव चुनखडक (बायोजेनिक लाइमस्टोन) म्हणतात.

जिथे समुद्रतळ उथळ असतो, सूर्यप्रकाश भरपूर असतो, पाण्याचे तापमान अधिक असते, अशा ठिकाणी प्रवाळांच्या वसाहती निर्माण होतात. या वसाहतींपासून ‘भित्तिका’ तयार होते. कालव (ऑइस्टर्स), सागरी शैवाल (मरीन अल्गी) असे अन्य काही सजीवही अशा ‘भित्तिका’ तयार करतात. पण प्रवाळांनी निर्माण केलेल्या भित्तिकांच्या तुलनेत इतर सजीवांनी केलेल्या भित्तिका लहान असतात.

प्राचीन कालखंडात प्रवाळभित्तिकांपासून निर्माण झालेले चुनखडक संपूर्ण जगभरात निरनिराळ्या पाषाणसमूहांत आढळतात. त्यांना प्रवाळमय चुनखडक (कोरलाइन लाइमस्टोन) म्हणतात. भारतातही अनेक ठिकाणच्या पाषाणसमूहांमध्ये ते आढळतात.

ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला असणाऱ्या प्रवाळ भित्तिकांचा समुदाय लाटा आणि जहाजे यांना किनाऱ्यापर्यंत येण्यास आडकाठी करतो आणि तो आकाराने प्रचंड आहे. म्हणून त्याला ‘महा अवरोधक भित्तिका’ म्हणतात. ही भित्तिका अवकाशातून पाहिली तरी दिसू शकते, इतकी मोठी आहे. ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनि यांच्यामध्ये असणाऱ्या सामुद्रधुनीमध्ये जी लहान बेटे आहेत त्या बेटांवरील लोकांना ही प्रवाळ भित्तिका फार पूर्वीपासून माहीत होती. आणि आजही ती त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. जैवविविधतेने समृद्ध अशा या ठिकाणाला १९८१ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.

डॉ. श्रीकांत कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader