‘मृत समुद्र’ (डेड सी) म्हणजेच ‘क्षार समुद्र’ हे निसर्गातील एक आश्चर्य होय. खरे तर हा समुद्र फार मोठय़ा आकाराचा नाही. तो मिठाच्या पाण्याचा जलाशय आहे. इस्राइल व जॉर्डनच्या वाळवंटी प्रदेशात हा समुद्र असून तो जगातील खोल खारट जलाशय आहे. त्याची निर्मिती लक्षावधी वर्षांपूर्वी झाली.
मृत समुद्राची क्षारता ३३.७ टक्के (३४० पी.पी.टी.) असून, ती सर्वसाधारण समुद्राच्या क्षारतेपेक्षा ९.६ पट अधिक असते. या पाण्याची क्षारता पराकोटीची उच्च असते. या उच्च क्षारतेमुळे या समुद्रात एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव जगू शकत नाही, म्हणूनच या समुद्राला ‘मृत समुद्र’ म्हणतात. या ३०६ मीटर खोल असलेल्या समुद्राची लांबी ६७ किलोमीटर व रुंदी १८ किलोमीटर असून जॉर्डन नदी या समुद्रास येऊन मिळते.
या समुद्राची क्षारता वाढण्याची कारणे म्हणजे अत्यंत अल्प पर्जन्यवृष्टी, नदीच्या गोडय़ा पाण्याचा कमी पुरवठा व वाळवंटी प्रदेशातील उष्णतेमुळे मोठय़ा प्रमाणात होणारे बाष्पीभवन! मृत समुद्राच्या उच्च क्षारतेमुळे पाण्याची घनता जास्त असते. त्यामुळे या समुद्रात माणूस उतरल्यास तो बुडण्याऐवजी पाण्यावर सहज तरंगू शकतो. मृत समुद्र म्हणजे निसर्गाचा चमत्कार असून तो खनिज आणि क्षारांचा नैसर्गिक साठा आहे. मृत समुद्राचा किनारा मिठाच्या स्फटिकांमुळे चमकतो. या समुद्राचे पाणी जवळजवळ तेलकट दिसते, त्याचे कारण म्हणजे त्याची उच्च क्षारता आणि घनता! मृत समुद्र समुद्रसपाटीपासून ४३० मीटर खाली आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा आहे.
मृत समुद्रातील पाण्याची पातळी दरवर्षी सरासरी ११० सेंटीमीटरने कमी होत आहे.
तेथील पर्यावरण सजीवांसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळे त्या पाण्यात प्राणी वा वनस्पती वाढू शकत नाहीत. फार अल्प प्रमाणात जिवाणू, सूक्ष्मजीव व सूक्ष्म बुरशी वाढते. काही वेळा पाण्याचा पृष्ठभागाचा रंग लालभडक होतो. विशिष्ट प्रकारच्या शैवालामुळे असे घडते. हजारो वर्षांपासून येथे पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. हे स्थळ जगातील पहिले ‘आरोग्य रिसॉर्ट’ बनले आहे. अनेक पर्यटक या पाण्यावर तरंगण्याची मजा घेतात. येथील खारट पाण्यामुळे व किनाऱ्यावरील गाळामुळे सोरायसिस, गजकर्ण, तारुण्यपीटिका इत्यादी त्वचारोग बरे होतात. अंगावरील गाळाच्या लेपामुळे त्वचेत क्षार शोषले जातात. पूर्वी रोमन लोक येथील गाळाचा साबणासारखा वापर करत. त्याने चेहरा स्वच्छ करत. त्यामुळे त्वचेत रक्तप्रवाह वाढतो, चेहऱ्यावरील सुरकुत्या जातात आणि त्वचा टवटवीत व चमकदार होते.
– प्राचार्य डॉ. किशोर पवार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org