पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने १९९८मध्ये ‘राष्ट्रीय अंटार्क्टिका आणि महासागर संशोधन केंद्रा’चे ‘नॅशनल सेंटर फॉर पोलर अॅण्ड ओशन रिसर्च’ म्हणून स्वायत्त संशोधन आणि विकास संस्थेत रूपांतर करण्यात आले.गोव्यातील वास्को येथे १४.७७ हेक्टरवर पसरलेल्या नयनरम्य पठारावर ही संस्था आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश भारताच्या अंटार्क्टिका आणि अंटार्क्टिका ध्रुवीय क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, हा आहे. अंटार्क्टिकामधील ‘मैत्री’ आणि ‘भारती’ या भारतीय संशोधन स्थानकांची वर्षभर देखभाल, जुलै २००८ पासून नॉर्वेमधील स्वालबार्ड क्षेत्रातील ‘हिमाद्री’ या अंटार्क्टिकासंबंधित भारताच्या संशोधन केंद्राचे व्यवस्थापन, जुलै २०१४ पासून कोंगस्फॉयर्डनमधील ‘इंडार्क’ वेधशाळेचे व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्र्टिक आणि अंटार्क्टिका संशोधनात सहभा, अशी या संस्थेची उद्दिष्टे आहेत.
ध्रुवीय संशोधनाबाबत आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, ‘सागर कन्या’ संशोधन नौकेची देखभाल, ध्रुवीय प्रदेशातील आणि हिमालयातील बर्फाच्या नमुन्यांची साठवण, आंतरराष्ट्रीय समित्यांचे नेतृत्व आणि दरवर्षी ध्रुवीय प्रदेशात केलेल्या भारतीय मोहिमांशी संबंधित सर्व वैज्ञानिक, प्रवास, निवास आणि इतर सुविधांचे व्यवस्थापन आणि अंमलबजावणी या संस्थेमार्फत केली जाते.
संस्थेद्वारे २०१६मध्ये हिमाचल प्रदेशाच्या लाहौल-स्पिती खोऱ्यात समुद्रसपाटीपासून चार हजार ८० मीटर उंचीवर ‘हिमांश’ नावाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. येथे हिमालयातील बर्फाच्या जैवरासायनिक पैलूंचा अभ्यास करून त्याची ध्रुवीय वातावरणाशी तुलना करणे, तसेच पूर्वीचे हवामान आणि भविष्यातील हवामान बदलांच्या परिणामांविषयीच्या माहितीचा संग्रह करण्यासाठी हिमाचा वापर करून त्याचे मूल्यांकन केले जाते. हिमालयातील तीन हिमनद्यांची गतिशीलता आणि त्याच्या हवामानावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठीदेखील संशोधन केले जाते.
आंतरराष्ट्रीय महासागर शोध कार्यक्रमाद्वारे अरबी समुद्र खोऱ्यात देशाच्या व्यावर्ती आर्थिक क्षेत्राच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणांमध्ये आणि त्याच्या २००मीटरच्या पुढे विस्तारित भूखंड मंच प्रदेशात ही संस्था प्रमुख संशोधनकार्य करत आहे. खोल-समुद्रात ड्रिलिंग करून कडेच्या पाण्याच्या स्तंभातील वायूचे साठे (गॅस हायड्रेट्स) आणि अनेक धातूंच्या सल्फाइडसारखी संसाधनेदेखील शोधण्यात येतात. आतापर्यंत ४१ अंटार्क्टिका आणि २००७ पासून २३ आक्र्टिक मोहिमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करून ध्रुवीय भागातील जीवशात्र, भूभर्गशास्त्र, हिमनदी अभ्यास संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर या संस्थेने मोलाची भर घातली आहे.