सोळाव्या शतकात ओटोमान तुर्कांनी आणि इराणच्या सफवी सुलतानांनी आक्रमण करून अर्मेनियाचा निम्मा निम्मा प्रदेश घेतला. पुढच्या साधारणत: २५० वर्षांंत ओटोमान आणि सफवी इराणी सुलतानांमधील वैमनस्य वाढून या दोन सत्तांमध्ये अनेक युद्धे झाली. आणि ती अर्थातच अर्मेनियाच्या भूमीवर झाली. १५०१ ते १७३० या काळात अर्मेनियावरचे आधिपत्य चार वेळा ओटोमान तुर्की साम्राज्याकडे, तर चार वेळा सफवी इराणच्या सुलतानांकडे राहिले. यातील अधिकतर काळ अर्मेनियाचा पूर्वेकडील भाग इराणकडे तर पश्चिमेकडील भाग ओटोमान साम्राज्याकडे राहिला. १९व्या शतकाच्या आरंभी रशिया आणि इराणमध्ये झालेल्या युद्धांमध्ये पराभूत झालेल्या इराणने पूर्वेकडील अर्मेनियन प्रदेश रशियाला दिला. पहिल्या महायुद्ध काळात पश्चिमेकडील अर्मेनियात इस्तंबूलच्या ओटोमान सत्ता प्रदेशात ओटोमान सुलतानांनी तेथील मूळच्या ख्रिस्ती धार्मिक अर्मेनियन लोकांना प्रखर छळवादी वागणूक दिली. त्यातील अनेकांना हद्दपार केले आणि १५ लाखांवर लोकांची हत्या केली. १९१८ साली रशियात राज्यक्रांती होऊन रशियन साम्राज्य बरखास्त झाले, त्यानंतर या साम्राज्यातील विविध प्रदेशांनी स्वतंत्र होऊन स्वत:ची प्रजासत्ताक सरकारे स्थापन केली. १९१८ साली प्रजासत्ताक अर्मेनिया सरकार स्थापन झाले. या काळात पश्चिमेचा काही प्रदेश ओटोमान तुर्कांच्या ताब्यात होता आणि सत्ताधारी मुस्लीम तुर्क त्या प्रदेशात असलेल्या ख्रिस्ती अर्मेनियन लोकांवर अत्याचार करत, त्यांना दुय्यम नागरिकांची वागणूक देत होते. उपासमार आणि रोगग्रस्त असे हजारो ख्रिस्ती अर्मेनियन निर्वासित लोक समूहाने पूर्व अर्मेनियन प्रजासत्ताकात आश्रयाला येऊन राहिले.

पहिले महायुद्ध संपले आणि ब्रिटन, फ्रान्स वगैरे जेते राष्ट्रांच्या आघाडीने पराभूत ओटोमान सुलतानांशी १९२० मध्ये तह केला आणि या तहान्वये पश्चिम अर्मेनियातला ओटोमानच्या अंकीत असलेला सर्व प्रदेश त्यांनी सोडून नवीन प्रजासत्ताक अर्मेनियात समाविष्ट केला गेला. पुढे मार्च १९२२ मध्ये सोव्हिएत रशियाच्या रेड आर्मीने अर्मेनिया, जॉर्जिया आणि अझरबैजानवर आक्रमण करून या कॉकेशियस पर्वत प्रदेशातील तीन देशांचा वेगळा कॉकेशियन सोव्हिएत फेडरेशन ऑफ सोशॅलिस्ट रिपब्लिक हा राष्ट्रसंघ बनविला. हा राष्ट्रसंघ पुढे सोव्हिएत युनियनचा एक भाग बनला.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com