१७४० साली मराठय़ांनी अरकाटवर आक्रमण केले. दमालचेरी येथे मराठे आणि नवाब यांच्या फौजांमध्ये झालेल्या युद्धात तत्कालीन नवाब दोस्त अली आणि त्याचा मुलगा हसन अली मारले जाऊन अरकाटवर मराठय़ांनी आपला अंमल बसविला. दोस्त अलीचा मेव्हणा चंदासाहेब यालाही मराठय़ांनी कैद करून नागपूर येथे कैदेत ठेवले. पुढे अरकाटवर ताबा मिळविण्यात नवाब यशस्वी झाला आणि नागपूरच्या कैदेत असलेल्या चंदासाहेबाने फ्रेंचांच्या मदतीने कैदेतून सुटका करून घेतली. या काळात तत्कालीन अरकाट नवाब मुहम्मद अली वालाजा (कारकीर्द १७४९ ते १७९५) याच्याशी चंदासाहेबाचे वैमनस्य होऊन त्याने वालाजाला पदच्युत केले. वालाजाचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या मदतीने वालाजाने चंदासाहेबाचा बीमोड करून परत नवाबपदी आला. वालाजा आणि म्हैसूरच्या हैदरअली यांच्यामधील संघर्षांतून हैदरचे मित्र फ्रेंच आणि वालाजाचे मित्र ब्रिटिश यांच्यात १७८० साली झालेल्या युद्धात ब्रिटिशांनी हैदर आणि फ्रेंचांचा पूर्ण पराभव केला, परंतु या युद्धाचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी नवाब वालाजाकडून चार लाख पॅगोडा (तत्कालीन चलन) वसूल केले. या युद्धानंतर कंपनी सरकारच्या वर्चस्वाखाली आलेल्या अरकाटचा तेरावा नवाब मुलाम महम्मद गौस खानाची कारकीर्द इ.स. १८२५ ते १८५५ अशी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणी नसíगक पुरुष वारस नसल्यामुळे कंपनी सरकारने अरकाट राज्य १८५५ साली खालसा करून कंपनीच्या राज्यप्रदेशात विलीन केले. परंतु पुढे १८६७ साली महाराणी व्हिक्टोरियाने गौस खानाचा चुलता अझीम जाह याला ‘अमीर-ए-अरकाट’ अर्थात अरकाटचा राजा असा खिताब देऊन पुढच्या सर्व वारसराजांना करमुक्त निवृत्तिवेतन दिले. सध्या एकविसाव्या शतकातही हे निवृत्तिवेतन भारत सरकार अरकाटच्या वारसांना देत आहे.

-सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

वस्त्रोद्योग : मागोवा १
मराठी विज्ञान परिषदेतर्फे कुतूहल सदराकरिता २०१५ सालाकरिता वस्त्रोद्योग हा विषय निश्चित केला होता. आपल्या मूलभूत गरजांपकी एक गरज वस्त्र, पण सामान्यत: याविषयी तपशिलात काय जुजबी माहितीसुद्धा सामान्य जनतेला नसते. ही बाब नजरेसमोर ठेवून माहिती देण्याची तयारी केली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सर्व प्रकारचे तंतू नसíगक तसेच मानवनिर्मित, त्यांचे गुणधर्म आणि उपयोग याने सुरुवात केली. मात्र अगदी सुरुवातीला वस्त्रोद्योगाचा इतिहास, भारतीय वस्त्रोद्योगातील स्थित्यंतरे, या उद्योगातील भारताचे जगातील स्थान, सध्या प्रगतीला असलेला वाव इत्यादी विषयांचा ऊहापोह केला होता. सदराकरिता निवडलेले लेखक अध्यापन, उद्योग क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या व्यक्ती होत्या. विषय जरी तांत्रिक असला तरी भाषा जितकी सुलभ करता येईल तितकी केली.
सदर सुरू होताच काही व्यक्तींनी उत्साहाने लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. लेखांचे आणि लेखकांचे नियोजन सुरुवातीला केल्याने अशा उत्साही व्यक्तींना संधी देता आली नाही. तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञान, पण नुसती तेवढीच माहिती न देता थोडा इतिहास दिला. त्यामुळे लातूरच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी हे लेख वाचून सुती टॉवेल, चादरी, अभ्रे इत्यादी तयार करण्याचा उद्योग सुरू करावयाचा मनोदय व्यक्त करून मार्गदर्शनाची मागणी केली.
रसायन उद्योगातील एम. बी. गाडगीळ यांनी पॉलिप्रॉपिलीनविषयी लेख वाचून नेहमीच्या कामात येणाऱ्या अडचणी कळवल्या. तसेच अ‍ॅसबेस्टॉसऐवजी पॉलिप्रॉपिलीनचा वापर केला जातो, त्याबाबत अधिक माहिती मागितली. पॉलिस्टर आणि पॉलिप्रॉपिलीनमधील फरक जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली. वस्त्रोद्योगात दीर्घकाळ काम केलेल्या गजानन साळुंखे यांनी या माहितीचे पुस्तक करावे, अशी मागणी केली. ते सर्वाना उपयुक्त ठरेल, असे मत मांडले.
काही वाचकांनी तोंडी प्रतिक्रिया कळवल्या होत्या. आणखी काही विषयांची माहिती द्यावी. आताचे सदर बऱ्याच प्रकारे नवीन माहिती देत आहे. कापडाच्या निर्मितीचे सर्व पलू मांडणार आहात ना? लेखांच्या वाचनामुळे पुढील लेखात काय असेल याची उत्सुकता असते, ती शेवट पर्यंत टिकून राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सदराचे प्रकाशन सुरू असताना सतत प्रतिक्रिया येतच होत्या, त्यावरून ही उत्सुकता कायम राहिली असे वाटते.

– दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org