– डॉ. यश वेलणकर

रुग्णांची लक्षणे वार्धक्यापेक्षा वेगळी आहेत, अशी या आजाराची नोंद १९०६ मध्ये डॉ. एलोइझ अल्झायमर यांनी प्रथम केली; म्हणून या आजाराला त्यांच्या नावाने ओळखले जाते. ८५ वर्षांच्या ५० टक्के व्यक्तींमध्ये सध्या हा आजार दिसून येतो. या आजारात मेंदूमध्ये विशिष्ट प्रथिने साठतात, मेंदूच्या पेशींना होणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्या मृत्यू पावतात. याचा परिणाम आकलन, स्मरण, सजगता अशा अनेक गोष्टींवर होतो. हा आजार बरे करणारे  परिणामकारक औषध नाही. पण योग्य आहार, शरीराला व्यायाम, तणाव व्यवस्थापन, झोप आणि ‘न्युरोबिक्स’ म्हणजे मेंदूचा व्यायाम- या जीवनशैलीतील बदलांनी आजाराची गती मंद करता येते, तो टाळता येतो.

साठीनंतर शरीराची तशीच मनाची लवचीकता कमी होते. पूर्वीसारखे राहिले नाही असा तक्रारीचा सूर वाढतो, त्याने उदासी येते. ती टाळण्यासाठी घरात आणि जगात जे काही होत आहे त्याचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करायचा. झोप लागत नाही याचीही सारखी तक्रार मनातल्या मनातही करायची नाही. झोपेचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी झोपेची दैनंदिनी लिहिणे हा एक उपाय आहे. त्यामध्ये २४ तासांत किती वेळ झोप लागली याची नोंद ठेवायची. पाच मिनिटांची डुलकी आली तरी ते नोंदवायचे. रात्री किती वाजता प्रकाश मंद केला, साधारण किती वाजता झोप लागली, कधी जाग आली हे लिहायचे. रात्री ठरलेल्या वेळी आडवे व्हायचे आणि सहा तासांनी अंथरुणातून बाहेर पडायचे. त्या सहा तासांत झोप लागली नसेल तर श्वासांच्या हालचालीवर लक्ष ठेवायचे. पाच श्वास मोजून झाले की पुन्हा एकपासून सुरुवात करायची. पहाटे जाग आली की तरुणपणातील आठवणींच्या विचारात न राहता, काल घडलेले प्रसंग आठवायचे. काय खाल्ले, काय वाचले-पाहिले, कुणाला भेटलो, कोणत्या गप्पा मारल्या याची मनात नोंद करायची. साखरझोप आली तर पुन्हा झोपायचे.

दिवसा फिरायला जायचे. रोज नवीन माहिती घ्यायची. आठवडय़ात किमान एक नवीन ओळख करून घ्यायची. फिरायला जाताना एकाच ठिकाणी न जाता वेगळा रस्ता निवडायचा. जेवताना डोळे बंद करून चवीने पदार्थ ओळखायचे. सवयीचा नसणारा हात कामे करण्यासाठी वापरायचा. शब्दकोडी, सुडोकू सोडवायची. या मेंदूच्या व्यायामांना ‘न्युरोबिक्स’ म्हणतात. आपण आठवणीत रमलो आहोत याचे भान आले की लक्ष वर्तमानात क्षणात आणायचे. सजगता, साक्षीध्यान आणि कल्पनादर्शन ध्यान यांमुळे मेंदूच्या पेशी सक्रिय राहतात. त्यांच्या नियमित सरावाने आणि मेंदूच्या अन्य व्यायामांनी अल्झायमरची गती मंदावते.

yashwel@gmail.com