– डॉ. यश वेलणकर

विचार साक्षीभाव ठेवून पाहता येतात, पण ‘ओसीडी’ (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) म्हणजे मंत्रचळचा त्रास असलेल्या व्यक्तींत हेच शक्य होत नाही. हात धुण्यासारखी एखादी कृती पुन:पुन्हा करणे हा मंत्रचळाचा एक प्रकार. दुसऱ्या प्रकारात अशी बाह्यत: दिसणारी कोणतीही कृती नसते. पण मनातील एखादा विचार खूपच प्रबळ असतो, तो बराच वेळ कायम राहतो आणि स्वाभाविक काम करू देत नाही. मनातल्या मनात त्या विचाराशी केलेला संघर्ष खूप तीव्र असतो. वयाच्या सहाव्या वर्षांपासून याचा त्रास सुरू होऊ शकत असला तरी तो तारुण्यात अधिक त्रासदायक होतो. निरोगी माणसाच्या मनात विचार येत असतात. विचार येत असतात त्या वेळी मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय असते. एखाद्या समस्येवर माणूस जाणीवपूर्वक विचार करत असतो त्या वेळी मेंदूतील व्यवस्थापकीय कार्य करणारा भाग सक्रिय असतो. विचारभग्नता असलेल्या माणसात मात्र ही सीमारेषा खूप धूसर होते, त्याला विचार येणे आणि विचार करणे यातील फरकच समजत नाही. सतत विचारात राहिल्याने असे होऊ शकते. माणूस कोणतीही शारीरिक कृती सजगतेने करतो त्या वेळी मेंदूतील विचारांशी निगडित केंद्रांना काही क्षण विश्रांती मिळते. हल्ली शारीरिक कामे, मैदानी खेळ कमी झाल्याने ती मिळत नाही, त्यामुळे या त्रासाचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यतील १८ ते २२ वर्षांच्या पाच हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले असता आठ टक्के मुलामुलींत ओसीडीचा सौम्य त्रास आणि एक टक्का विद्यार्थ्यांत गंभीर त्रास आढळला. अशा त्रासामुळे अभ्यास, नातेसंबंध यावर अनेक दुष्परिणाम होतात. हा त्रास- ‘विचारभग्नता’ हा चिन्तारोगाचा एक प्रकार असून मानसोपचारांनी तो आटोक्यात ठेवता येतो, याचीच माहिती बहुसंख्य लोकांना नाही. बोलताना नजर समोरील व्यक्तीच्या नको त्या भागावर जाईल आणि ते त्या व्यक्तीच्या लक्षात येईल हाच विचार विचारभग्न व्यक्तीत एवढा तीव्र होतो की त्यामुळे माणसांशी प्रत्यक्ष संपर्क टाळला जातो. एकलकोंडेपणाने विचारात राहणे वाढते आणि माणूस आभासी जगातच राहतो, लग्नदेखील टाळतो. हा त्रास गंभीर होऊ द्यायचा नसेल तर मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला अधूनमधून विश्रांती द्यायला हवी. त्यासाठी सजग शारीरिक कृती आणि शरीरातील संवेदनांकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.

yashwel@gmail.com