– सुनीत पोतनीस

मॉरिशस बेटांवरचा ताबा डचांनी सोडल्यावर १७१५ साली फ्रेंचांनी मॉरिशसवर कब्जा केला आणि या द्वीपसमूहाचे नाव केले- ‘आइल दे फ्रान्स’! पुढचा जवळजवळ शतकभराचा काळ मॉरिशस द्वीपसमूह फ्रेंचांची एक वसाहत बनून राहिला. फ्रेंचांच्या शासनकाळात या प्रदेशाचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी राहिली. येथील फ्रेंच गव्हर्नरने पोर्ट लुइस या बंदराचा विकास करून तिथे नौदलाचा तळ तयार केला, तसेच जहाजबांधणी प्रकल्पही सुरू केला. मॉरिशसच्या फ्रेंच वसाहतीने प्रशासनाची जबाबदारी ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’कडे दिलेली होती.

फ्रेंच सत्ताकाळात मोझाम्बीक व झांजीबारमधून मोठ्या प्रमाणात इथे गुलाम आणले जात. त्यामुळे या बेटांची लोकसंख्या वेगाने वाढत गेली. इतकी की, अठराव्या शतकाच्या अखेरीस मॉरिशसमधील एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के लोक हे गुलाम होते. पुदुचेरी येथूनही भारतीय वंशाची अनेक कुटुंबे या काळात मॉरिशसमध्ये काही कामांची मक्तेदारी मिळवून तिथे स्थायिक झाली.

साधारणत: १७६७ ते १८१० या काळात फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत मॉरिशस वसाहतीचे प्रशासन फ्रेंच सरकारचे अधिकारी आणि मॉरिशसच्याच काही नागरिकांनी उत्तम सांभाळले. याच काळात जॅक्स डी सेंट-पियरे हा फ्रेंच लेखक मॉरिशसमध्येच होता. पॅरिस आणि मॉरिशसच्या सेंट लुइस येथील तत्कालीन परिस्थितीवर त्याने ‘पॉल एत व्हर्जिनी’ ही प्रेमकथात्मक कादंबरी लिहिली. ही कादंबरी पुढे सर्व युरोपीय भाषांत अनुवादित होऊन युरोपीय लोकांमध्ये मॉरिशसबद्दल कुतूहल वाढले आणि ते पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले. अनेक फ्रेंच कुटुंबे या बेटांवर येऊन स्थायिक झाली.

ब्रिटिशांशी फ्रान्सची युद्धे १८०३ ते १८१० या काळात झाली. या काळात भारतातून ब्रिटनकडे जाणारी जहाजे काही काळ मॉरिशसमध्ये थांबत असत. फ्रेंचांची माणसे हल्ला करून ती जहाजे लुटत. अखेरीस ब्रिटिश आपल्या रॉयल नेव्हीद्वारे फ्रेंच आरमारावर हल्ला करून मॉरिशस ताब्यात घेण्याच्या तयारीला लागले. ३ सप्टेंबर १८१० रोजी ब्रिटिशांनी फ्रेंचांचे आत्मसमर्पण काही अटींवर स्वीकारून मॉरिशस द्वीपसमूहावर ताबा मिळवला.

sunitpotnis94@gmail.com