डियान फॉसी.. पूर्व आफ्रिकेतील रवांडा आणि कांगोच्या सीमावर्ती प्रदेशातील सुमारे १२ हजार फूट उंच विरुंगा पर्वतावर आढळणाऱ्या ‘माऊंटन गोरिला’ या नरवानर प्रजातीचा अभ्यास करणारी प्राणीशास्त्रज्ञ. १९६३ च्या सप्टेंबरमध्ये डियान फॉसी ही अमेरिकी तरुणी सफारीसाठी आफ्रिकेच्या जंगलात आली, तेव्हा माऊंटन गोरिलांना तिने पहिल्यांदा पाहिले, तेही दुरूनच. या गोरिलांच्या अवयवांना अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी होती; त्यामुळे त्यांची बेकायदेशीर शिकार करण्याचे प्रमाण खूप वाढले होते. परिणामी गोरिलांच्या या प्रजातीची संख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली होती. त्यामुळे तरुण डियानने या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तिथेच तळ ठोकण्याचा मनोमन निश्चय केला.

मात्र, त्या प्रदेशातील कमालीची राजकीय अस्थिरता आणि अतिशय आक्रमक, आधुनिक शस्त्रांनी सज्ज असे शिकारी अशा दोन्ही पातळ्यांवर लढायचे आहे, याची डियानला लवकरच जाणीव झाली. योगायोगाने डियान त्या भागात काम करणारे प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ डॉ. लुइस लिकी यांच्या संपर्कात आली. त्यांनी डियानला सर्व प्रकारचे साहाय्य केले आणि तिचे जंगलात प्रत्यक्ष वास्तव्य व संशोधनकार्य सुरू झाले. गोरिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी ती त्यांच्या आसपास वावरू लागली. चार पायांवर रांगू लागली. त्यांच्यासारखेच अंग खाजवणे, वनस्पतींची पाने तोडून तोंडात टाकणे, त्यांच्यासारखे आवाज काढणे असे प्रयोग सुरू केले. दहा महिन्यांच्या या अथक प्रयत्नांनंतर गोरिला तिला ‘ओळखू’ लागले. जवळपास तीन वर्षांच्या या सहवासात गोरिला आणि डियान यांच्यातले अंतर कमी होत गेले.

एके दिवशी जंगलात फिरताना पिनटस नावाचा गोरिला डियानजवळ आला आणि काही सेकंदांसाठी त्याने डियानच्या हाताला स्पर्श केला. या स्पर्शाने पिनटस आणि डियान दोघेही भारावून गेले. कारण माणूस आणि गोरिला यांच्यातील कित्येक वर्षांचे अंतर नाहीसे करणारा तो ऐतिहासिक स्पर्श होता!

डियानने जवळपास दोन दशके या गोरिलांच्या सहवासात राहून संवर्धनाचे कार्य सुरू ठेवले. त्यामुळेच आफ्रिकेत माऊंटन गोरिलांची संख्या ५०० हून अधिक झाली. पर्वतावरच्या शिकारी, वृक्षतोडीचे प्रमाणही कमी झाले. परंतु हे कार्य शिकारी टोळ्यांना खुपत होते. याचीच परिणती म्हणून २६ डिसेंबर १९८५ रोजी तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, तिच्या कार्यामुळेच साऱ्या जगाचे लक्ष माऊंटन गोरिलांच्या संवर्धनाकडे वेधले गेले.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org