सध्या पूर्व युरोपातला बेलारूस हा देश, हल्ली त्याचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी चालविलेल्या दडपशाही व हुकुमशाहीमुळे जागतिक राजकारणात चर्चेचा, चिंतेचा विषय ठरला. आपल्याकडे बहुतांश लोकांना जगात बेलारूस नावाचा एक देश आहे हेसुद्धा या लुकाशेन्कोंच्या कारवायांचे किस्से जगासमोर आल्यावर समजले!

प्रजासत्ताक बेलारूसच्या उत्तर आणि पूर्वेला रशिया, दक्षिणेस युक्रेन, पश्चिमेस पोलंड तर ईशान्येस लिथुआनिया आणि लातविया या देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत. दोन लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या देशाचा ४० टक्के प्रदेश वनव्याप्त आहे. ९५ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या प्रजासत्ताक बेलारूसचे मिन्स्क हे राजधानीचे शहर आहे. स्लाव आणि बाल्ट या जमातीचे लोक हे इथले मूळचे रहिवासी. बेलारूसला युरोपात अनेक वेळा बायलोरशिया तसेच व्हाईट रूस या नावांनीही संबोधले जाते. परंतु रशियन राज्यक्रांतीच्या काळात कम्युनिस्टांच्या रेड आर्मीला विरोध करणारी ‘व्हाइट आर्मी’ होती, या नाम साधम्र्यामुळे बेलारूसचे व्हाईट रूस हे नाव! इसवी सनाच्या नवव्या शतकात रशियन प्रदेशात असलेल्या कीव्हन रूस या बलाढ्य साम्राज्यात बेलारूसचा प्रदेश समाविष्ट झाला. हे विशाल साम्राज्य रशिया, युक्रेन, बेलारूस वगैरे मोठ्या क्षेत्रावर पसरले होते. पुढच्या काळात बेलारूसमध्ये अनेक सत्तांतरे झाली. तेराव्या शतकात बेलारूस आणि कीव्हन रूस साम्राज्याच्या इतर प्रदेशांवर मंगोल टोळ्यांनी हल्ले करून विध्वंस केला. दुर्बळ बनलेल्या बेलारूसचा ताबा शेजारच्या लिथुआनियाच्या राजाने विनासायास घेतला. १३८६ साली लिथुआनिया व पोलंडच्या राजघराण्यांमध्ये आपसात काही विवाह होऊन जवळचे नातेसंबंध जोडले गेले आणि पुढे दोन्ही साम्राज्यांचे मिळून एक राज्यकुल बनविण्यात आले. या काळात म्हणजे १५व्या शतकाच्या अखेरीस रशियाचा झार इव्हान तृतीयने पूर्वी रशियन साम्राज्यात असलेला परंतु पुढे गमावलेला बेलारूस आणि युक्रेनचा प्रदेश परत घेण्यासाठी जय्यत लष्करी तयारी आरंभली. परंतु प्रबळ पोलंडपुढे त्याचे काही चालले नाही. १७९५ साली मात्र रशियाचे आक्रमण यशस्वी होऊन युद्धात पराभूत झालेल्या पोलंडचे तीन भाग झाले. हे तीन भाग रशिया, प्रशिया आणि ऑस्ट्रिया यांच्या वाट्याला आले. त्यातील बेलारूसी प्रदेश रशियन साम्राज्यात सामील केला गेला. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com