डॉ. सुधाकर आगरकर

भारतीय आयुर्वेदशास्त्र हे माणसाचं आरोग्य आणि आजार यावर आपलं लक्ष केंद्रित करतं. या शास्त्रात वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवर कोणते उपचार करावेत याचं सविस्तर वर्णन आढळतं. आयुर्वेदशास्त्रानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिणं फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. असं केल्यानं अन्नपचन चांगलं होतं, त्वचा तुकतुकीत राहते आणि अनेक रोगांपासून आपलं संरक्षण होतं.

हा सल्ला मानून अनेक जण तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी साठवून ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी पितात. प्रत्येक वेळी असंच केलं पाहिजे असं नाही. परंतु पाणी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी सहा तास ठेवून ते प्यावं असं सांगितलं जातं. ते केवळ तांब्याच्या पेल्यात टाकून ताबडतोब प्यायल्यास फायदा होत नाही असंही वैद्य मंडळी सांगतात.

आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले उपचार आणि पथ्यपाणी कितपत योग्य आहेत हे पाहण्यासाठी गेल्या काही दशकांत विविध प्रयोग करण्यात आले. विशेषत: आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. या चाचणीत असं लक्षात आलं की तांब्याच्या भांड्यात सहा तासांहून जास्त काळ जर पाणी साठवून ठेवलं तर त्या पाण्यात तांब्याचे आयन काही प्रमाणात उतरतात. हे आयन शरीराला बाधक असणार्‍या जंतूंना मारून टाकतात.

त्याचबरोबर असं पाणी प्यायल्यास आपल्या शरीराला आवश्यक असलेलं तांबं सहज मिळतं. त्याचा उपयोग रक्तातल्या लाल पेशी बनवण्यासाठी तसंच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी होतो. ‘अति तिथे माती’ अशी एक म्हण आहे… कोणत्याही बाबीचा अतिरेक झाला तर ते अपायकारक ठरू शकतं!. तांब्याच्या आयनांबाबतही हे तंतोतंत लागू पडतं. मुळात आपल्या शरीराला तांबं या धातूची गरज अतिशय अल्प प्रमाणात असते.

सहसा आपल्या रोजच्या आहारातूनच ती पूर्ण होते. सतत तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं आवश्यकतेपेक्षा जास्त तांबं शरीरात जाण्याची शक्यता असते. त्याचे शरीरावर वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात. म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. याहीपेक्षा मोठा धोका संभवतो तो दिवसेंदिवस पाणी भांड्यात साठवून ठेवण्याचा. पाणी जर खूप काळ तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर हिरवट निळ्या रंगाचा तांब्याचा क्षार तळाशी बसत जातो. हा पदार्थ शरीरात गेल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून तांब्याचं भांडं ठरावीक काळानं स्वच्छ करून त्यात ताजं पाणी भरावं आणि तांब्याच्या भांड्यात किती काळ पाणी साठवून ठेवून प्यावं यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ते प्यावं!