भानू काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ हा राजकपूरचा १९७८ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या शीर्षगीतामुळे ते शब्द घरोघर पोहोचले. अर्थात त्यापूर्वीपासूनच हे तीन शब्द म्हणजे अनेकांना भारतीय संस्कृतीचा एक आदर्श वाटतो आणि त्यांचे मूळ संस्कृतात असणार याविषयी आपली खात्रीच असते. पण प्रत्यक्षात ही शब्दत्रिवेणी म्हणजे ‘ The True,  The Beautiful and The Good’ या व्हिक्टर क्यूझं (Victor Cousin, फ्रेंच उच्चार वेगळा आहे) या फ्रेंच लेखकाने १८५३ साली लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षक आहे. मानवी जीवनाची सार्थकता कशात आहे याची मीमांसा करणारे हे पुस्तक खूप गाजले.

ओ. डब्लू. वाईट (O.  W.  Wight) या इंग्लिश लेखकाने पुढच्याच वर्षी त्याचा इंग्रजी अनुवाद, शीर्षकातील शब्दांची किंचित अदलाबदल करून, अमेरिकेत प्रकाशित केला आणि त्याचवेळी ते पुस्तक बंगालमध्येही पोहोचले. श्री. म. माटे यांनी ‘रोहिणी’ मासिकात याच शीर्षकाचा एक लेख लिहिला होता व हे वचन मूळ भारतीय नसून इंग्रजीतून आलेले आहे, असेही त्यात नमूद केले होते. संशोधक वृत्तीच्या दुर्गाबाई भागवत यांच्या वाचनात १९४०-४२ च्या सुमारास तो लेख आला. अधिक शोध घेतल्यावर एशियाटिक सोसायटीच्या मुंबईतील ग्रंथालयात दुर्गाबाईंना तो इंग्रजी अनुवाद मिळाला व त्याचा बंगाली अनुवाद झाल्याचेही कळले. पण त्या इंग्रजी वचनाचे इतके सुंदर भारतीयीकरण कोणी केले हे मात्र स्पष्ट होत नव्हते. दुर्गाबाईंनी त्या बंगाली अनुवादाची छायाप्रत कोलकाता येथील केंद्रीय ग्रंथालयातून मागवली आणि तेव्हा रवीन्द्रनाथ टागोर यांचे वडील बंधू ज्योतिरिन्द्रनाथ यांनी तो बंगाली अनुवाद ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम’ या शीर्षकाखाली केल्याचे स्पष्ट झाले.

दुर्गाबाईंची व्यासंगी वृत्ती यातून दिसते आणि त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीचे मानलेले आदर्श हा खूपदा जागतिक वारसा असतो हेही लक्षात येते. ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ हा असाच एक आदर्श. याचे मूळ आहे ‘लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी’ (liberty,  equality,  fraternity) या १७८९ सालच्या फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्यापुढे ठेवलेल्या तीन आदर्शात. जगभर सर्वानाच ते प्रेरणादायी वाटले आणि पुढे ती उक्ती भारताच्या राज्यघटनेतही भारतीय समाजापुढचा आदर्श म्हणून समाविष्ट केली गेली.

bhanukale@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhasasutra about marathi language satyam shivam sundaram indian culture zws
First published on: 16-09-2022 at 02:17 IST