मराठी प्रतिशब्दनिर्मितीच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यव्यवहार कोश दिसतो. शासनव्यवहारातील फारसी-अरबी शब्दांऐवजी मराठी शब्दनिर्मितीसाठी महाराजांनी राज्यव्यवहार कोशाची रचना केली होती.
यानंतरचं एक मौलिक कार्य म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या प्रोत्साहनाने तयार झालेला ‘श्रीसयाजीशासनकल्पतरू’ हा इंग्रजी, गुजराती, मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी, हिंदी आणि बंगाली अशा आठ भाषांमधील समान शब्द एकापुढे एक दिलेला प्रचंड पृष्ठसंख्येचा कोश. अतिशय अभ्यासपूर्वक केलेल्या या कोशात शब्दाच्या सुगमतेला जास्त महत्त्व दिलं होतं.




नंतर याविषयातली आपल्या डोळय़ासमोर येणारी दोन प्रमुख नावं म्हणजे स्वा. वि. दा. सावरकर आणि डॉ. माधवराव पटवर्धन. सावरकरांच्या प्रभावी भाषाशुद्धी चळवळीला श्री. के. क्षीरसागर यांनी त्या वेळी प्रखर विरोध केला होता. क्षीरसागरांचं ‘खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी’ हे बडोदे येथे केलेलं भाषण नंतर ‘केसरी’तही प्रसिद्ध झालं. या भाषणाला सावरकरांनी दिलेलं उत्तर आणि नंतर सावरकरांच्या ‘भाषाशुद्धि’ पुस्तकाच्या १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीला क्षीरसागर यांनीच लिहिलेली प्रस्तावना यातून आपल्याला काही तत्त्वबोध होण्यासाठी ते सारं मुळातूनच वाचायला हवं. ‘भाषाशुद्धि’मध्ये विविध क्षेत्रांतील अंदाजे ६०० शब्दांची यादी आहे. पटवर्धनांच्या ‘भाषाशुद्धि विवेक’ या पुस्तकातील ‘बहिष्कार्य शब्दांचा कोश’ या यादीतील फारसी-अरबीतील बहिष्कार्य आणि पर्यायी असे दोन्ही शब्द आज वापरात दिसतात.
याव्यतिरिक्तही, अभिव्यक्तीसाठी नवशब्दांची निर्मिती करणारे साहित्यिक, समाजमाध्यमांवरील जिज्ञासू शब्दप्रेमी आणि दररोज ही जितीजागती भाषा वापरणारे आपण सगळेच आपापल्या परीने सतत प्रतिशब्द तयार करत असतोच, कधी कोट-बूट वापरून तर कधी ‘ठेसनावर टायमात’ जाऊन.
शेवटी भाषा वापरणाऱ्या समाजाच्या झोळीत जो तो आपापल्या वकुबानुसार सतत शब्दांचं दान टाकत राहतो. समाज त्यातलं वेचकवेधक आपल्याकडे राखून ठेवतो आणि बाकीचं पुन्हा विखरून टाकतो, कदाचित पुढच्या शब्दवेडय़ांसाठी.
वैशाली पेंडसे-कार्लेकर