डेक्कन म्हणजे ‘दख्खन’ या शब्दाचे इंग्रजांनी केलेले रूप आणि डेक्कन जिमखाना म्हणजे पुण्यातील एक प्रतिष्ठित क्लब. त्या सगळय़ा परिसरालाच डेक्कन जिमखाना म्हटले जाते इतके त्या जिमखान्याचे माहात्म्य. त्या जिमखान्यात जायचा इतकी वर्षे पुण्यात राहूनही कधी योग आला नव्हता. अगदी अलीकडेच तो आला तेव्हा प्रथमच समजले की शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असूनही तिथे किती मोकळी जागा आहे आणि ऑलिम्पिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय सामनेदेखील तिथे कसे आयोजित करता येतात. वेगवेगळय़ा १५ प्रकारचे खेळ खेळायची इथे सोय आहे. शिवाय मोठा तरणतलावदेखील आहे. याचे बांधकाम सुरू असताना जमिनीखाली बरेच झरे लागले व त्यामुळे हा प्रशस्त तलाव उभारता आला. बॅडिमटन हा इथला विशेष लोकप्रिय खेळ. या खेळाचे आंतरराष्ट्रीय नियमदेखील इथेच १८७३ साली तयार केले गेले. एखाद्या क्लबप्रमाणे अनेक जण इथे गप्पा मारायलासुद्धा येतात. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे हे सारे शक्य झाले ते लोकमान्य टिळक आणि तत्कालीन मंडळींना मनापासून नमस्कार करावासा वाटला.

जिमखाना हा बऱ्याच अलीकडे भाषेत रूढ झालेला शब्द. व्यायाम करायची किंवा खेळायची जागा असा त्याचा अर्थ. भारतातील पहिला जिमखाना १८६१ साली उत्तराखंड राज्यातील रुरकी येथे लष्कराच्या पुढाकारातून स्थापन केला गेला. आशिया खंडातील पहिले इंजिनीअिरग कॉलेज इथेच स्थापन झाले. बंगाल सॅपर्स या लष्कराच्या इंजिनीअिरग विभागाचे इथे मुख्यालय आहे आणि त्यामुळेच बहुधा हा जिमखाना स्थापन झाला असावा. पुढे भारतातील इतर शहरांतही जिमखाने निघाले. जसे, मुंबईतील बॉम्बे जिमखाना, हिंदु जिमखाना, पारसी जिमखाना किंवा इस्लाम जिमखाना.

फारसी किंवा इंग्रजीमधून आलेले अनेक शब्द आपण या सदरात बघितले. ‘जिमखाना’ शब्दाचे वेगळेपण म्हणजे त्याचा पूर्वार्ध ‘जिम’ हा जिम्नॅशियम या इंग्रजी (मूळ लॅटिन) शब्दाच्या लघुरूपावरून, तर उत्तरार्ध ‘खाना’ हा कक्ष किंवा जागा या अर्थाच्या फारसी शब्दावरून घेतलेला आहे. ‘जिम’ ऊर्फ व्यायामशाळा आता अनेक ठिकाणी आढळतात. ‘खाना’ हा फारसी शब्दही जागोजागी आढळतो. जसे की, दिवाणखाना, मुदपाकखाना, फरासखाना, कबुतरखाना, जनानखाना, तालीमखाना, किताबखाना इत्यादी. पण या दोन्ही भाषांच्या परस्परसंपर्कातून साकारलेला ‘जिमखाना’ हा शब्द अगदी आगळाच म्हणायचा. भारताच्या संमिश्र सांस्कृतिक वारशाचे ‘जिमखाना’ हा शब्द म्हणजे एक प्रतीक आहे.

– भानू काळे

bhanukale@gmail.com