Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

दोन गोष्टी जेव्हा एकमेकांशी अगदी पूर्णत: जुळणाऱ्या असतात, तेव्हा ‘त्या तंतोतंत जुळणाऱ्या आहेत’ असे म्हटले जाते. तंतू म्हणजे धागा या मूळ संस्कृत शब्दापासून बनलेला हा शब्द. असे असंख्य तंतू एकात एक गुंफून एखादे वस्त्र विणले जाते. दोन वस्त्रे जर अगदी एकसारखी असायला हवी असतील, तर त्यांचा प्रत्येक तंतू एकमेकांशी जुळायला हवा; कारण त्यांच्यात थोडा जरी फरक असला तरी मग ती अगदी एकसारखी दिसणार नाहीत. धागा न् धागा म्हणजेच ‘तंतू अन् तंतू’ हे शब्द जोडून ‘तंतोतंत’ हा शब्द आला.

या तंतू शब्दाला संस्कृत शब्दकोशात दुसराही एक अर्थ आहे. तो म्हणजे तार. बोटाने तार छेडून वाजवली जाणारी एकतारी, वीणा, तंबोरा, सतार वगैरे वाद्ये म्हणजे तंतुवाद्ये. मैफल सुरू करण्यापूर्वी त्या तारा एकमेकांशी नीट जोडून घ्याव्या लागतात. त्यावरून ‘तंतोतंत म्हणजे सुरात लावलेले वाद्य’ असाही एक अर्थ आहे. ‘त’ या एकाच अक्षराचा वापर करून बनलेला चार अक्षरी शब्द हेही या शब्दाचे एक वैशिष्टय़. बोंबाबोंब हा तसाच आणखी एक शब्द. तंतोतंत शब्दाशी विरोधार्थाने संलग्न म्हणता येईल असा एक शब्द म्हणजे ‘नक्कल’.

हा शब्द मूळ ‘नकल्’ असा असून तो अरबी शब्द आहे. ‘मूळ प्रतीबरहुकूम तयार केलेली प्रत’ हा त्याचा अर्थ. मुद्रणाचा शोध लागायच्या आधी याला खूपच महत्त्व होते; कारण हाताने लिहूनच कुठल्याही कागदपत्राच्या किंवा पोथीच्या अधिक प्रती काढल्या जात. एकावरून दुसरी प्रत, दुसरीवरून तिसरी. अशा वेळी प्रत्येक प्रतीमागे थोडा-थोडा जरी फरक पडत गेला, तरी विसाव्या-तिसाव्या प्रतीत तो खूपच लक्षणीय असणार होता. म्हणूनच दुसरी प्रत मूळ प्रतीशी अगदी कानामात्रा जुळणारी असणे, म्हणजेच तंतोतंत जुळणारी असणे, आवश्यक होते. पुढे केव्हा तरी ‘नकल’पासून नकली (म्हणजे बनावट) हा खोटेपणाचा आरोप करणारा, दुर्गुणसूचक शब्द आला. जसे की, ‘नकली मालापासून सावध राहा.’ मराठीत त्यातून नकलाकर किंवा नकल्या हा अगदी वेगळय़ा अर्थाचा, कलादर्शक शब्दही बनला; जो मूळ अरबीत नाही. ‘नक्कल करणे’ (मिमिक्री) या कलेतून पुढे ‘एकपात्री प्रयोग’ हा मंचीय आविष्कारही तयार झाला! एकाच शब्दातून काळाच्या ओघात किती वेगवेगळे अर्थ प्रसवतात!

– भानू काळे

bhanukale@gmail.com