कधीकधी वाक्प्रचारातील अर्थाची नेमकी उकल पटकन होत नाही. तेव्हा असे वाक्प्रचार कोडय़ात टाकणारे वाटू लागतात. ‘तुझ्या पीएच.डी.चं घोडं कुठे पेंड खातंय?’ असा प्रश्न कधीतरी आपण ऐकलेला असतो. घोडे पेंड खाणे म्हणजे काम रखडणे/ रेंगाळणे, हा त्याचा सूचितार्थही माहीत असतो, तरी समाधान होत नाही! मग संशोधन केल्यावर कळते की मूळ शब्द ‘पेण’ (पेंड नव्हे!) असा आहे. मौखिक रूपात असलेले वाक्प्रचार कालौघात रूप बदलतात. उच्चार बदलला की अर्थाची वाट निसरडी होते! त्याचे हे एक उदाहरण आहे. पेण किंवा पेणे म्हणजे लांबच्या प्रवासात लागणारे विश्रांतीचे ठिकाण (टप्पा) होय. तेथे आले की घोडे थांबतात, दम खातात म्हणजेच पेण खातात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ शब्द वाचल्यावर अर्थ न उलगडल्यामुळे पेचात टाकणारा आणखी एक वाक्प्रचार म्हणजे ‘ताकास तूर न लागू देणे’, हा होय. याचा अर्थ आहे, मुळीच पत्ता लागू न देणे. गंमत म्हणजे हा वाक्प्रचार आपल्या अर्थाचा पत्ताच लागू देत नाही! कारण आपल्या ओळखीच्या असलेल्या ताक आणि तूर (तूरडाळ) या खाद्यपदार्थाशी यातील शब्दांचा संबंध नाही. यातील शब्दांना संदर्भ आहेत, ते विणकर/ कोष्टी यांच्या व्यवसायाशी निगडित! (वेगवेगळय़ा व्यवसायांतील शब्दसंपत्तीमुळे वाक्प्रचार संपन्न झाले आहेत, ते आपण यापूर्वी एका लेखात पाहिले आहेच!) ‘महाराष्ट्र शब्दकोश’ (संपादक दाते, कर्वे) मध्ये यातील शब्दांचा अर्थ सापडतो. ताका किंवा तागा म्हणजे हातमागावरचे अखंड कापड आणि तूर म्हणजे कोष्टय़ाची दांडी. या दांडीभोवती विणलेले वस्त्र गुंडाळले जात असते. ताका आणि तूर यांचा वास्तविक सतत संबंध जुळायला हवा! पण तसे न होणे म्हणजे, ताकास तूर लागू न देणे. लक्षणेने याचा अर्थ आहे, थांगपत्ता लागू न देणे, दाद न देणे!

वाक्प्रचार जेव्हा असे उखाणे घातल्यासारखे वागतात, तेव्हा ते केवळ अलंकार नसून बौद्धिक आनंदाचे स्रोतही आहेत, याची खात्री पटू लागते!

– डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra exact solution meaning phrases research solution ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST