डॉ. नीलिमा गुंडी

मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले काही न्याय हे वाक्प्रचार म्हणून रूढ झाले आहेत. येथे ‘न्याय’ याचा अर्थ ‘दृष्टांत’ किंवा समर्पक उदाहरणातून सुचवलेला बोध होय. ‘काकतालीय न्याय’ याचा मराठीत रूढ अर्थ आहे, कावळा बसायला नि फांदी मोडायला एक वेळ येणे. ‘बोलाफुलाची गाठ’ हा वाक्प्रचारदेखील हाच अर्थ व्यक्त करतो. याचा सूचित अर्थ आहे, एखादी गोष्ट अचानक/ कर्मधर्मसंयोगाने घडणे. घुणाक्षरन्याय याचाही अर्थ असंकल्पित घटना असा आहे; कारण घुण नावाचा कीटक लाकूड कोरतो, तेव्हा त्यात एखाद्या अक्षराची आकृती उमटल्याचा भास होतो.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

शुकनलिकान्याय- पोपट पकडण्यासाठी पारधी एक नळी टांगून ठेवतात. ती नळी फिरत असते. पोपट त्या नळीवर बसतो नि नळी फिरल्यावर तो खाली येऊन उलटा टांगला जातो. पंख असल्याचे विसरून तो भीतीने नळी पायात घट्ट धरतो. एकंदरीत आपल्या क्षमतांचा विसर पडल्यामुळे येणारी असहायता यातून व्यक्त होते. शलाकापरीक्षा करणे, हा वाक्प्रचारही दृष्टांतासारखाच आहे. शलाका म्हणजे सळई. कोश अथवा ग्रंथ असतो, तेव्हा त्यात एक सळई घालून, कोणतेही पान उघडून, ते वाचून त्याची परीक्षा करतात. यावरून याचा अर्थ होतो, थोडा अंश पारखून एकूण अंदाज घेणे. ‘शितावरून भाताची परीक्षा’ याचा अर्थदेखील हाच आहे.

‘हंसक्षीरन्याय’ कधीतरी आपल्या वाचनात आलेला असतो. दूध आणि पाणी एकत्र असेल तर हंस हा पक्षी दूध तेवढे पितो आणि पाणी वेगळे काढतो, अशी समजूत आहे. बरे- वाईट एकत्र असताना त्यातील चांगले तेवढे निवडणे, यात अभिप्रेत आहे. ‘नीरक्षीरविवेक’ हा वाक्प्रचारही यातूनच आला आहे. ‘देहलीदीपकन्याय’ यात देहली (संस्कृत शब्द) म्हणजे उंबरठा. उंबरठय़ावर दिवा ठेवला असता त्याचा उजेड दोन्ही बाजूंना पडतो. त्यामुळे जेव्हा एखादा शब्द दोन्हीकडे सारखाच लागू पडतो, तेव्हा याचा वापर करतात. असे विविध दृष्टांत लोकभाषेत रूढ होऊन वापरले जात असतात. त्यांतून अलंकरणाबरोबरच अनुभवातून आलेले शहाणपणही सूत्ररूपाने संक्रमित होत असते.