भाषासूत्र : परकीय शब्दांसाठी मराठी पर्याय

परकीय शब्दांना मराठी पर्यायी शब्द सुचवण्याने काय होणार आहे किंवा तयार केलेल्या या पारिभाषिक शब्दांचा कोठे उपयोग करणार, असे   प्रश्न पडू शकतात.

परकीय शब्दांना मराठी पर्यायी शब्द सुचवण्याने काय होणार आहे किंवा तयार केलेल्या या पारिभाषिक शब्दांचा कोठे उपयोग करणार, असे   प्रश्न पडू शकतात. परंतु, आपण प्रचलित शब्दांच्या साहाय्याने नवीन सामासिक शब्द निर्माण करून त्या परकीय शब्दांऐवजी हे नवीन शब्द प्रचारात आणू शकतो. हे करताना अतितांत्रिक परिभाषा पद्धतीचा अवलंब करून चालणार नाही. कारण अशाप्रकारे तयार केलेल्या शब्दांमध्ये अर्थवाहकता कमी असते आणि असे शब्द समाजाकडून स्वीकारले जाण्याची शक्यताही कमी असते.

   ‘पाठचिकित्से’मधील असे काही शब्द पाहू या.

आता ‘ऑथेंटिसिटी’ हा शब्द आहे, त्याऐवजी ‘अधिकृतत्व’ हा शब्द आपण वापरू शकतो. एखाद्या गोष्टीचे प्रामाण्य दाखवायचे असेल तर त्या संदर्भात या शब्दाची आवश्यकता भासते. सप्रमाणता/ अधिप्रमाणता/ यथार्थता/ अस्सलपणा असेही शब्द संदर्भानुसार वापरता येतील.

एखादे संशोधन करत असताना मूळ हस्तलिखिताचा आपणास काहीच तपास लागत नाही आणि ज्याच्या अस्तित्वाविषयी देखील आपल्याला खात्री नाही त्या वेळी ‘अनट्रेस्ड’ या ऐवजी आपण ‘अनुपलब्ध’ हा शब्द वापरू शकतो. ‘करप्ट रििडग’ला ‘अपपाठ’ म्हणू शकतो. मूळ ग्रंथकाराच्या ग्रंथात नसलेला शब्द म्हणजे ‘अपपाठ’. अशा शब्दाला ‘प्रक्षिप्त’ असेही म्हटले जाते. ‘हायपोथेटिकल’ला ‘कल्पित’ वा ‘गृहीत’ शब्द वापरता येईल. ‘ट्रॅडिशनल रीिडग’ला ‘रूढपाठ’, ‘परंपरागत पाठ’, ‘प्रचलित पाठ’ असे शब्द वापरता येतील. मॅन्युस्क्रिप्टला/ कोडेक्स मॅन्युस्क्रिप्टला पोथी, हस्तलिखित असेही शब्द आहेत. ब्रिक मॅन्युस्क्रिप्टला ‘इष्टिकालेख’ म्हणजेच विटांवर कोरलेले लेख, वुडन बोर्ड मॅन्युस्क्रिप्टला ‘फलकलेख’, सिल्क मॅन्युस्क्रिप्टला ‘कौशेयलेख’ म्हणजेच रेशमी वस्त्रावर लिहिलेले लेख असा शब्द वापरता येईल. लेदर मॅन्युस्क्रिप्टला ‘चर्मपटलेख’, अर्थ मॅन्युस्क्रिप्टला ‘भूलेख’ हा पर्यायी शब्द आहे. जमिनीवर कवडय़ा, काचा, मणी कंकणे इत्यादींच्या साहाय्याने केलेल्या लिखाणाला ‘कुट्टिमलेख’ असे नाव वेंकटेशशास्त्री जोशींनी सुचविले आहे. त्यांचा ‘पाठचिकित्साविषयक परिभाषा’ हा लेख जिज्ञासूंनी मुळातून वाचायला हवा.

– डॉ. निधी पटवर्धन

 nidheepatwardhan@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhashasutra marathi options foreign words alternate words terminology ysh

Next Story
भाषासूत्र : वाक्प्रचार आणि ‘अंक’लिपी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी