भाषासूत्र : शेजीने दिले बोट, त्याने काय भरेल पोट

शेजी म्हणजे शेजारीण. शेजारणीने आपण केलेला पदार्थ प्रेमापोटी आपल्याला दिला, तर त्याने काही आपले पोट भरत नसते.

भाषासूत्र : शेजीने दिले बोट, त्याने काय भरेल पोट
( संग्रहित छायचित्र )

शेजी म्हणजे शेजारीण. शेजारणीने आपण केलेला पदार्थ प्रेमापोटी आपल्याला दिला, तर त्याने काही आपले पोट भरत नसते.
तो पदार्थ आपल्याला जरी आवडला तरी तो काही आपण परत मागूही शकत नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. कमल आणि विमल दोन सख्ख्या शेजारणी. दोघींची अगदी घट्ट मैत्री. दोघींचे सर्व बाबतीत साटेलोटे चाललेले असायचे.

एकदा विमलने तिने केलेले चमचमीत बटाटेवडे कमलला आणून दिले. म्हणाली, ‘थोडेच दिले आहेत गं ! म्हटलं तेवढाच तुझा मधल्या वेळेचा नाश्ता करण्याचा प्रपंच वाचला.’ ती गेल्यावर कमलच्या सासूबाई हसून म्हणाल्या, ‘अगं ! तिने जरी चांगल्या भावनेनं हे वडे आणून दिले, तरी त्यात आपला नाश्ता कसा होणार? वाढीची वयं आहेत ना मुलांची? त्यांची भूक कशी भागणार एवढय़ाशा वडय़ांत? कमल, तुझा नाश्त्याचा व्याप काही चुकणार नाही हं. तू करंच बाई नाश्ता! अगं म्हणतात ना, ‘शेजीने दिले बोट, त्याने काय भरेल पोट?’

फक्त कुटुंबापुरताच त्याचा आशय मर्यादित आहे असे नाही, तर एखादी संस्था, एखादा देश या बाबतीतही ही म्हण लागू पडण्यासारखी आहे.
उदाहरणार्थ- एखादा देश आपण उत्पादित केलेली गोष्ट मदत म्हणून देऊ करीत असला तरी ती मदत आपल्याला सतत मिळेलच, याची शाश्वती नाही. आपण आपल्या देशातच ती गोष्ट कशी निर्माण करू शकतो का हे बघितले पाहिजे, म्हणजे आपल्याला मिंधेपण येत नाही. आपली वाट अधिक सामथ्र्यवान होते.

‘शेजीने दिले बोट, त्याने काय भरेल पोट’ ही म्हण आपल्या शेजारील राष्ट्राने जरी ते चहा आयात करीत असले तरी ‘तीन कप चहा घेण्याऐवजी एकच कप चहा पीत जा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका’, असा संदेश देत सार्थ ठरवली आहे. शेवटी आपल्या गरजा आपल्यालाच भागवाव्या लागतात.- डॉ. माधवी वैद्य
madhavivaidya@yaamail. Com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुतूहल : मांडवगडावरील महालांतील पाषाण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी