एक होते खेडेगाव. त्या गावात भली-बुरी, अज्ञानी-सज्ञानी, बावळट-चतुर, भित्री-धीट अनेक प्रकारची माणसे राहत होती. त्यातच होता एक ‘शिवार पंडित’. ‘शिवार पंडित’ ही त्याला मिळालेली, गावच्या लोकांनी त्याला बहाल केलेली एक पदवीच म्हणा ना! कारण काही लोक स्वत:ला खूपच विद्वान समजतात ते त्यांचे समजणे स्वयंघोषितच असते. ते सगळय़ांना आपल्या अर्धवट असलेल्या ज्ञानाच्या आधारे सल्ले देत सुटतात. या शिवार पंडिताची मजा म्हणजे घरात झोपले तर घराचे छप्पर कोसळून आपला मृत्यू ओढवेल, असे समजून तो गावाच्या खिंडीत झोपत असे.. असे त्याचे अगाध ज्ञान!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावाच्या लोकांनाही काय म्हणावे?

अशा अर्धवट विद्वानावर, त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवून त्याचे सल्ले मागायला ते जात असत. अशाच विश्वासावर विसंबून गावातला एक माणूस पुत्रप्राप्तीसाठी त्यांचा सल्ला मागायला गेला. पुत्रप्राप्ती वगैरे काही नाही. पण गाठीची बरीच संपत्ती मात्र त्याला गंगार्पण करावी लागली. त्यावरून गावात एक म्हण मात्र पडली. ‘शिवार पंडित आणि झोपतो खिंडीत.’ अगदी आजच्या काळातही अशी ढिसाळ पंडितगिरी करणारे आहेतच की! जरा आजूबाजूला नजर टाका, असे पांडित्य दाखवणारे अनेक दिसतील.

एक बाई आपले वजन घटावे म्हणून अशाच एका ‘शिवार पंडिता’चा सल्ला मागायला गेली. त्याने तिला आपल्या अर्धवट ज्ञानाने दिपवून टाकले आणि अनेक सल्ले दिले. तिचे वजन तर अजिबात घटले नाहीच पण आम्लपित्त, उच्च रक्तदाबासारख्या आधी नसलेल्या व्याधींची ती शिकार झाली.

शेवटी तिचा नवरा त्या विद्वानावर खूपच रागावला आणि म्हणाला, ‘‘अहो विद्वान! बस झाला तुमचा सल्ला, माझ्या पत्नीला तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा झाला नाही. पण आमच्या ज्ञानात मात्र चांगली भर पडली, की लोकांनी तुमच्यासारख्या शिवार पंडितांच्या वाऱ्यालाही उभे राहू नये. तुम्ही म्हणजे ‘शिवार पंडित आणि राहतो खिंडीत’ याचा जातिवंत नमुनाच आहात.’’

– डॉ. माधवी वैद्य

madhavivaidya@ymail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra people of the village too much scholar ysh
First published on: 28-06-2022 at 00:02 IST