आपली भाषा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे तिच्यात विविध व्यवसायांशी निगडित अनेक वाक्प्रचार आढळतात. आपल्याकडे शेती हा मोठा व्यवसाय आहे. ‘खंडोगणती’ हा वाक्प्रचार शेतीशी संबंधित आहे. यात खंडी हा मूळ शब्द आहे. खंडी हे धान्य मापण्याचे एक प्रमाण होय. वीस मणाची एक खंडी. त्यामुळे ‘खंडोगणती’ म्हणजे पुष्कळ असा अर्थ रूढ झाला आहे. उदा. -आपल्या देशात खंडोगणती बोली आहेत. ‘उचलबांगडी करणे’ हा वाक्प्रचार मच्छिमारीच्या  व्यवसायाशी नाते सांगतो. मुळात तेथे ‘पांगडी’ असा शब्द आहे. त्यात बदल झाला.  पांगडी म्हणजे  मासे धरण्यासाठी मच्छिमार (कोळी)  वापरतात ते मोठे जाळे. ते जाळे इतके मोठे असते, की अनेक जणांनी चारी बाजूंनी धरून ते उचलावे लागते! त्यातून पुढे उचलबांगडी करणे म्हणजे हकालपट्टी करणे, उच्चाटन करणे, असा अर्थ रूढ झाला.

‘मात्रा न चालणे’ म्हणजे उपाय न चालणे. मात्रा हा शब्द वैद्यकीय  व्यवसायातील आहे. मात्रा म्हणजे रोगावर इलाज करण्यासाठी दिलेले औषध, औषधाचे प्रमाण. आयुर्वेद उपचारपद्धतीत औषधाची विशिष्ट मात्रा देतात. त्यामुळे मात्रा न चालणे म्हणजे उपाय न चालणे होय.  ‘रुकार देणे’ म्हणजे होकार देणे. रुकार हा शब्द प्रशासनाशी संबंधित आहे. त्यात ‘रु’ फारसी असून ‘कार’ संस्कृत भाषेतील आहे. त्यातले ‘रु’ हे अक्षर  रुजवात या शब्दाचे पहिले अक्षर आहे. रुजवात /रुजुवात म्हणजे निरनिराळे हिशेब, कागद इत्यादी समक्ष ताडून पाहणे आणि रुकार म्हणजे नक्कल  मान्य करताना केलेले चिन्ह होय. त्यातून ‘संमती देणे’ या अर्थी हा वाक्प्रचार रूढ झाला.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

सोनाराने कान टोचणे, माप पदरात घालणे असे इतरही अनेक वाक्प्रचार आठवतात. भाषेच्या जीवनस्पर्शित्वाची ते जणू ग्वाही देत असतात.  दिवंगत विचारवंत श्री. म. माटे यांनी चर्मकार, रंगारी, सुतार आदींच्या भाषेतून आलेल्या वाक्प्रचारांविषयी ‘भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी’ (साहित्यधारा, १९४३ ) हा लेख लिहिला आहे. जिज्ञासू वाचकांनी तो लेखही जरूर वाचावा.

–  डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com