भाषासूत्र : अफलातून आणि यवन..

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक मानला गेलेला सॉक्रेटिस, त्याचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल आणि नंतर त्याचा शिष्य अलेक्झांडर ही अद्वितीय मानली गेलेली मूळची ग्रीक गुरुपरंपरा आहे.

भाषासूत्र : अफलातून आणि यवन..

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक मानला गेलेला सॉक्रेटिस, त्याचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल आणि नंतर त्याचा शिष्य अलेक्झांडर ही अद्वितीय मानली गेलेली मूळची ग्रीक गुरुपरंपरा आहे. अरबी भाषेत त्यांच्या नावांचे अपभ्रंश रूढ झाले आणि हिंदीच्या माध्यमातून ते भारतातही पसरले. हिंदीत सॉक्रेटिसला ‘सुकरात’ म्हटले गेले, तर प्लेटोला ‘अफलातून’, अ‍ॅरिस्टॉटलला ‘अरस्तू’ म्हटले गेले तर अलेक्झांडरला ‘सिकंदर’ (मराठी पाठभेद ‘शिकंदर’.)

‘अफलातून’ या प्लेटोच्या नामकरणात पूर्वी ‘स्वत:ला फार शहाणा समजणारा’ असाही एक अर्थ रूढ होता. पण आज मात्र त्या अर्थाने तो शब्द कोणी वापरत नाही. ‘भन्नाट’ अशा अर्थाने तो शब्द रूढ आहे. त्याच नावाची भरपूर खवा, तूप आणि सुका मेवा घातलेली मिठाईही प्रसिद्ध आहे. मुंबईच्या महंमद अली रोडवरील दोन-तीन प्रख्यात दुकानांतून तिची जगभर निर्यात होते.

‘शिकंदर’ ऊर्फ अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने भारतावर स्वारी करण्यापूर्वी पर्शिया (इराण) हा देश जिंकला होता व पर्शियन भाषेत त्याला इस्कंदर म्हटले गेले. त्याचेच शिकंदर हे अपभ्रष्ट रूप अरबांनी भारतात रूढ केले. एक व्यक्तिनाम असले तरी पर्शियन भाषेत त्याचा अर्थ ‘शूर योद्धा’ असाही आहे व त्याच अर्थाने तो शब्द भारतीय भाषांतही रूढ झाला. उदाहरणार्थ, ‘जो जीता वोही सिकंदर’. ‘सिकंदर’ नावाचा सोहराब मोदी यांचा १९४१ सालचा पृथ्वीराज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आजही सिनेरसिकांच्या स्मरणात असेल. ‘मुकद्दर का सिकंदर’ या नावातही ‘नियतीला जिंकणारा योद्धा’ हा भाव आहे. यवन हा शब्दही मूळ ग्रीकवरून आलेला आहे. आधुनिक ग्रीस देश ज्या अनेक घटक राज्यांच्या एकत्रीकरणातून बनला, त्यातील एक राज्य होते आयोनिया.

शिकंदराच्या स्वारीनंतर त्याच्याबरोबर आलेले आयोनियातील अनेक सैनिक भारतातच राहिले आणि त्यांच्या पुढच्या पिढय़ाही नंतरची सुमारे बाराशे वर्षे भारतातच राहिल्या. स्थानिक भारतीयांशी संकर होऊन त्यांची एक विशिष्ट जमात तयार झाली जी दिसायला काहीशी ग्रीक होती. त्यांना ‘यवन’ म्हणत. यवनांचा संस्कृत नाटकांवर बराच प्रभाव पडला आहे. पुढे ‘परकीय’ या अर्थाने आणि मुस्लिमांना उद्देशूनही ‘यवन’ शब्द वापरला जाऊ लागला.

भानू काळे

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाषासूत्र : प्रतिशब्दकर्त्यांची मांदियाळी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी