चोच हे पक्ष्यांचं बहुपयोगी आणि महत्त्वाचं इंद्रिय! अन्न गोळा करणं, शिकार करणं, ती शिकार खाणं, पिल्लांना भरवणं, घरटी बांधणं, पंख स्वच्छ करणं आणि स्वसंरक्षण ही चोचीची विविध कामं !  जसं आपण वेगवेगळे पदार्थ खायला काटा, चमचा, सुरी अशी विशिष्ट साधनं वापरतो, तसंच पक्ष्यांच्या चोचींचा आकार ते कोणत्या प्रकारचं अन्न खातात यावर अवलंबून असतो.

पक्ष्यांना दात नसल्यामुळे ते चोचीनं अन्नाचे तुकडे करतात आणि न चावताच ते गिळून टाकतात. या क्रियेत चोचीची विशिष्ट रचना कामी येते.  चिमणीसारख्या पक्ष्यांना दाणे किंवा बिया सहज टिपता व फोडता याव्यात म्हणून त्यांची चोच छोटी आणि शंकू आकाराची असते, तर फुलांमधला रस पिणार्‍या पक्ष्यांची बारीक आणि लांब चोच स्ट्रॉचं काम करते.

याउलट घुबड, घार किंवा गिधाडासारख्या शिकारी पक्ष्यांना मांसाची चिरफाड करता यावी म्हणून त्यांची चोच धारदार असते. झाडाच्या सालीमध्ये राहणारे कीटक खाण्यासाठी सुतारपक्षी एका सेकंदात १८ ते २० वेळा खोडावर चोचीनं आघात करतो. असं तो दिवसातून ५०० ते ६०० वेळा करतो. त्याची चोच छिन्नीसारखी सरळ आणि टोकदार असल्यामुळे त्यानं लावलेलं बळ खोडावरल्या अगदी छोट्या भागावर एकवटतं, तिथला दाब वाढतो आणि खोड पोखरलं जातं.

पोपटाला जाड आवरण असलेली फळं खाता यावीत म्हणून त्याची चोच अडकित्त्यासारखी बाकदार आणि मजबूत असते. त्याचे डोळे डोक्याच्या दोन बाजूला असल्याने त्याला तो खात असलेलं अन्न दिसत नाही. अशा वेळेस त्याच्या चोचीच्या टोकावर, आतल्या बाजूला असलेले चेतातंतू त्याला फळाच्या आकारमानाबद्दल माहिती पुरवतात. त्यानुसार पोपट चोचीच्या आत ते अन्न हलवतो आणि बरोबर ठरावीक कोनामध्ये त्यावर आघात करतो. तसंच या बाकदार चोचीच्या सहाय्याने पोपट फांद्यांवर लटकून झाडावर चढतो.

चोच वजनानं हलक्या अशा हाडांची बनलेली असते आणि त्यावर ‘केरेटिन’ नावाच्या प्रथिनाचं आवरण असतं. या केरेटिनमुळेच चोची विविध रंगांच्या बनतात. आपली नखं आणि केसदेखील याच प्रथिनानं बनलेले असतात. त्यामुळे ज्याप्रकारे आपले केस व नखं वाढत जातात त्याचप्रकारे पक्ष्याची चोचही वाढत राहते. मात्र, चोचीच्या विविध कार्यांमुळे ती नैसर्गिकरीत्या सतत तासली जाते.

अन्नाच्या विविधतेनुसार तयार झालेले चोचींचे वेगवेगळे आकार हे अनुकूलनाचं एक उत्तम उदाहरण आहे. अनुकूलन हा सजीवांच्या उत्क्रांतीमधला तसेच जैवविविधतेला कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच पक्ष्यांची चोच हा नेहमी कुतूहलाचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे.   

उमा रानडे 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org