– सुजाता आग्रे
किती तरी वेळा आपण पत्त्यांनी खेळतो. पत्ते हातात घेतो, ते पिसतो, वाकवतो, पण ते सहजासहजी फाटत नाहीत.
पत्ते न फाटण्यामागचं कारण हे त्यांच्या रचनेमध्ये दडलं आहे. सुरुवातीच्या काळात पत्ते फक्त कागदाचे असायचे आणि ते लवकर फाटायचे. पण १९व्या शतकात जसजसा वार्निशचा आणि नंतर प्लास्टिकचा वापर सुरू झाला तसतसे पत्ते अधिक टिकाऊ बनले.
चांगल्या दर्जाचे पत्ते हे काही साध्या कागदापासून बनवलेले नसतात, तर ते दोन ते तीन जाड कागद डिंकाच्या साहाय्याने एकत्र चिकटवून बनवलेले असतात. असं केल्यानं ते मजबूत आणि जाड होतात. पत्त्यांसाठी वापरला जाणारा कागदही सामान्य कागदापेक्षा वेगळा असतो. यात चांगल्या दर्जाचे आणि लांब तंतू वापरले जातात. हे तंतू एकमेकांत घट्ट गुंफलेले असतात, ज्यामुळे पत्त्याची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. तसंच पत्त्यांच्या दोन थरांच्यामध्ये जो डिंक असतो, तो अशा एका विशिष्ट पदार्थाचा असतो, ज्यामुळे पत्ता अपारदर्शक होतो. यामुळे पत्त्यांमधून प्रकाश आरपार जात नाही आणि म्हणून समोरच्या खेळाडूला तुमच्या हातात कोणता पत्ता आहे ते कळत नाही.
पत्त्यांच्या पृष्ठभागावर प्लास्टिकचा एक पातळ थर लावतात. त्यामुळे पत्ते गुळगुळीत होतात आणि हवेतला ओलावा किंवा हातांचा ओलावा कागदात शिरत नाही. यामुळेच पत्ता मऊ होऊन फाटत नाही. या प्लास्टिकच्या थराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा प्लास्टिकचा थर पत्त्याला मूळ आकारात यायला मदत करतो. म्हणजेच तो पत्त्याला लवचीक बनवतो. खरं तर हे प्लास्टिक म्हणजे कृत्रिम पॉलिमर असतं. या पॉलिमरचे रेणू हे लांब साखळीच्या आकाराचे असतात. या साखळ्या एकमेकांवर अगदी सहजपणे सरकू शकतात. म्हणूनच जेव्हा आपण पत्ता वाकवतो तेव्हा या साखळ्या थोड्या हलतात किंवा सरकतात, पण तुटत नाहीत. या पॉलिमरच्या साखळ्यांमधील बंध हे खूप कडक किंवा घट्ट नसतात, त्यामुळे या साखळ्या थोड्या लांब-जवळ होऊ शकतात. म्हणूनच पत्ता वाकवल्यानंतरही तो जसा होता तसा परत सरळ होऊ शकतो. तसंच पत्त्यांचे कोपरे हे अर्धवर्तुळाकार करतात, त्यामुळेही ते पटकन फाटत नाहीत.
थोडक्यात सांगायचं तर उत्तम दर्जाचा कागद, प्लास्टिकचा थर आणि पत्त्यांचे अर्धवर्तुळाकार कोपरे या पत्त्यांच्या रचनेमुळे त्यांना लवचीकता प्राप्त होते आणि ते सहजपणे फाटू शकत नाहीत. पत्ते दीर्घकाळ टिकावेत म्हणून धातूंपासूनही पत्ते तयार केले जातात. स्टेनलेस स्टील, तांबे आणि ॲल्युमिनियमसारख्या धातूंपासून बनवलेले पत्ते टिकाऊ असतात. कधी कधी तर सोनं किंवा चांदी या धातूंचेही पत्ते तयार केले जातात.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
