नवदेशांचा उदयास्त : ब्रिटिश माल्टा

पहिल्या महायुद्ध काळात १९१५ ते १९१८ मध्ये दोस्तराष्ट्रांच्या मोठ्या संख्येने जखमी झालेल्या सैनिकांच्या औषधोपचारासाठी त्यांना माल्टामध्ये ठेवले होते.

(‘सात जून १९१९च्या शहिदां’चे माल्टातील स्मारक. (आपल्याकडे जलियाँवाला बाग हत्याकांडही त्याच वर्षी, १३ एप्रिल रोजी घडले !)

माल्टा बेटावरील जनतेच्या इच्छेप्रमाणे ब्रिटिशांनी १८१४ मध्ये माल्टाचे सार्वभौमत्व स्वीकारून ती ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनल्याचे जाहीर केले. बदलत्या काळात माल्टाचे महत्त्व त्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे वाढतच गेले. १८६९ साली सुएझ कालवा खुला झाल्यावर माल्टा हा तर भूमध्य समुद्रातील एक महत्त्वाचा आणि आवश्यक थांबा बनला. युरोपातून पौर्वात्य देशांमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणारी जहाजे माल्टामध्ये एक थांबा घेत असत. भूमध्य समुद्राचे पश्चिम टोक असलेले  जिब्राल्टरची खाडी आणि पूर्व टोकाकडील इजिप्त यामधील सागरी व्यापारी मार्गावरील, विशेषत: ब्रिटिशांच्या भारताशी चालणाऱ्या व्यापारी मार्गात माल्टाचे स्थान महत्त्वाचे होते. पहिल्या महायुद्ध काळात १९१५ ते १९१८ मध्ये दोस्तराष्ट्रांच्या मोठ्या संख्येने जखमी झालेल्या सैनिकांच्या औषधोपचारासाठी त्यांना माल्टामध्ये ठेवले होते. त्यामुळे माल्टाला गमतीने ‘नर्स ऑफ द मेडिटरेनियन’ असे नाव युरोपीय देशांत रूढ झाले होते. ब्रिटिशांनी युद्धानंतर त्यांच्या वसाहतीत नवीन कर सुरू केल्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनात १९१९ साली माल्टी लोकांवर केलेल्या गोळीबारात काही लोक मारले गेले. त्याचा स्मृतिदिन दरवर्षी  ७ जून रोजी काळे बिल्ले लावून होतो. दुसऱ्या महायुद्धापूर्वी माल्टाच्या राजधानीचे शहर व्हॅलेटा येथे ब्रिटिश शाही नौदलाचे मुख्यालय होते. परंतु ते जर्मन हल्ल्यांच्या टापूत असल्याने विन्स्टन चर्चिल यांनी हे मुख्यालय इजिप्तमध्ये नेले. दुसऱ्या महायुद्धात माल्टाने महत्त्वाची भूमिका बजावली. माल्टा हे इटलीच्या जवळ असल्याने आणि इटलीच्या दक्षिणेतील सिसिली येथे जर्मन आघाडीच्या नाविक दलाचा तळ असल्याने जर्मनी आणि इटलीने ब्रिटिश माल्टावर जोरदार हवाई बॉम्ब हल्ले केले. माल्टात दोस्त राष्ट्रांचा नाविक तळ आणि पाणबुडीचा तळ होता.  माल्टामध्ये ब्रिटिशांनी रेडिओ केंद्र उभारून ते शत्रूचे गुप्त लष्करी संदेश मिळवून त्यानुसार जर्मन आघाडीच्या सैन्यावर नाविक आणि हवाई हल्ले आरंभले. ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात माल्टी जनतेने फार महत्त्वाची मदत केली. माल्टी जनतेच्या मदतीने ब्रिटिश सम्राट जॉर्ज सहावे हे भारावून गेले आणि त्यांनी माल्टाला जॉर्ज क्रॉस हा मानाचा पुरस्कार दिला. या जॉर्ज क्रॉस पदकाचे चित्र पुढे स्वतंत्र माल्टाच्या ध्वजावरही राहिले आहे. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: British malta a colony of the british empire freight from europe to eastern countries passenger transport akp

ताज्या बातम्या